परभणी जिल्ह्यावर ओढावले दुष्काळाचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्ह्यात यावर्षीही पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगाम अक्षरश: वाया गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, भूईमुग, मूग ही पीके उधवस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून जिल्ह्यात पाण्याअभावी अनेक समस्या निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासन सध्या पीकपेरा आढावा घेत आहे. पाऊसच नसल्यामुळे जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने तात्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरु लागली आहे.

गेल्या चार वर्षापासून पावसाळ्यातील पाऊस अनियमित झाला आहे. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजले आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने रबी हंगामातील पेरणीवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा प्रयत्न केला असता, उगवण झाली नसल्याने शेतकरी हाताश झाले आहेत. एकीकडे ऑक्टोबर हिट जावणत आहे तर दुसरीकडे पाणी आणि चारा टंचाई परिस्थिती डोके वर काढत आहे.

पावसाळ्यातील चार महिन्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने छोट्या-मोठ्या धरणात अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. त्यातच परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील जमिनीमध्ये ओलावा नाही. त्यातच शेतातील बोअर ऑक्टोबर महिन्यातच कोरडेठाक पडू लागले आहेत. तसेच विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पेरणीवर दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र पावणे तीन लाख हेक्टर एवढे आहे. रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक लागवड ज्वारी, हरभरा पिकांची होते. त्याखालोखाल गहू, करडई आदी पिकांची लागवड करण्यात येते. परंतु, जिल्ह्यात मागील २ ते अडीच महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविली. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील जलाशयामध्ये पाणीसाठा झाला नाही. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून पाऊस न पडल्याने शेतातील जमिनीतील ओलावाच राहिला नाही. त्यातच बोअर व विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील जेमतेम पेरणी होण्याची शक्यता असून पेरलेले पीक शेतकऱ्यांच्या हातात पडेल की नाही, याचीही शाश्वती नाही. शेतकरी पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्याऐवजी शेती पडीक ठेवण्याकडे कल दिसून येत आहे. पेरणी करुनही काहीही उपयोग होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकरी सोयाबीन काढणी केल्यानंतर लगेच शेताची मशागत करून पेरणीची तयारी करतात परंतु सद्य:स्थितीत जमिनीत ओलावा नाही अन् विहिरींना पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दुकानांवर रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी आदी बि-बियाणे, खत खरेदी करण्यासाठी पाठ फिरविल्याने कृषी दुकानावर शुकशुकाट दिसून येत आहे.

यंदा तर खरीप हंगामामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून पावसाने ऐन पिके जोमात असतांनाच दोन महिन्यांचा खंड दिल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून गेली. त्यातच ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून जाणार आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भूजलपातळीत कमालीची घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्याऐवजी शेत पडिक ठेवण्याचा कल दिसून येत आहे. शेत जमिनीत ओलावा नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या, जिल्ह्यात भयावह परिस्थिती, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने त्वरीत परिस्थितीचा आढावा घेऊन या दुष्काळावर मुख्यमंत्री काय घोषणा करणार आहेत, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.