सटाण्यातील बहुतांशी जलस्रोत आटले, पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

सटाणा तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांशी जलस्रोत आटल्याने विहिरी कोरडय़ठाक असून, शेतीतील कूपनलिकांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा भयावह असेल असे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. ग्रामीण भागात सर्वप्रथम आज पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या अनेक भागात निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये शासनाने टँकर पाणीपुरवठा केला असून, बऱयाच ग्रामपंचायतींनी टँकर सुरू करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव दिले आहेत. परिसरातील बहुतांशी जलस्रोत आटले असून, बरेच तलाव कोरडेठाक आहेत. शासनाने कोटय़वधी रुपये खर्च करून राबविले जलयुक्त शिवार यंदा कमी पावसामुळे शिवाराच्या शिवार ओस पडले आहे. अनेक शेतकऱयांनी शेतीपिकात जनावरे सोडून दिल्याचे दिसते. त्यामुळे येणाऱया काळात जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर होणार आहे.

इथल्या नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्या…
तालुक्यात अनेक गावांमध्ये गावाला पाणीपुरवठा करणारी नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्या असून, तालुक्यातील खिरमाणी, चौगाव, इजमाणे, श्रीपुरवडे, भाक्षी, रामतीर, नवेगाव, पिंपळदर, आनंदपुर, टेंभे वरचे चिराई, राहुड, नळकस व आखतवाडे ही गावे तर लोणारवाडी व वघाणेपाडा अशा दोन वाडय़ांना शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तसेच खमताणे, तळवाडे, भामेर, जुनीशेमळी, भाक्षी, पारनेर, ढोलबारे, आव्हाटी, वनोली या आठ गावांनी शासनाच्या टँकरसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविले आहे.

ज्या गावांमधून पाण्याबाबत प्रस्ताव मिळत आहेत, त्याबाबत तालुकास्तरीय समितीद्वारे सर्वेक्षण करून गरजेनुसार विहीर बांधून अथवा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठय़ाचे नियोजन करावे व नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.
– प्रमोद हिले, तहसीलदार, बागलाण