पावसाची प्रतीक्षा; पाणी टंचाईने अनेकांचे संसार छावणीत

सामना प्रतिनिधी । आष्टी

आष्टी तालुक्याची राज्यात अतिदुष्काळी तालुका अशी ओळख आहे. तालुक्यामध्ये पाणी टंचाईने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. प्रत्य़ेकजण टँकरची वाट पाहत आहे. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी तालुक्यात मोठया प्रमाणावर चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. तालुक्यात जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी नसल्याने अनेकांचे संसार छावणीत आले आहेत. शेतातील उन्हाळी कामे आटोपली आहेत. आता पावसाची प्रतीक्षा बळीराजा करत आहे.

बीड जिल्हयात सर्वाधीक दुष्काळाच्या झळा आष्टी तालुक्याला बसत आहे. तालुक्यातील अनेक गावे तहानलेली असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजही अनेक गावे टँकरवरच अवलंबून आहेत. टँकरच्या पाण्याशिवाय या गावांना दुसरा पर्याय नाही. जनावरांना खाण्यासाठी चारा शिल्लक नाही. छावणीतील चाऱ्यावरच जनावरांची उपजिवीका सुरु आहे. चारा टंचाईमुळे दुग्धव्यवसाय ही तोटयात आला आहे. त्यामुळे अर्थिक मंदीही जाणवत आहे.

दुष्काळामुळे पाणी नाही, पाणी नाही त्यामुळे उत्पन्न नाही, उत्पन्न नसल्याने पैसा नाही. त्यामुळे अर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जनावरांच्या पेंडीचे व खुराकाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुष्काळात महागाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांजवळील चारा संपला आहे. चारा छावण्यांच्या आधाराने जनावरे तग धरतच आहेत. चारा नसल्याने दुग्ध व्यवसायात घट झाली आहे. याचा परिणाम शेतक-यांच्या अर्थीक बाबीवर होत आहे. त्यामुळे शेतकरी आता आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत.