
कॉड्रिला क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्या आठ जणांना आजची रात्र जेलऐवजी एनसीबी कोठडीत काढावी लागणार आहे. त्या आठ जणांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तर ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने नव्याने अटक केलेल्या अर्चित कुमारला न्यायालयाने दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे.
क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुन्मुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जसवाल, इस्मित सिंग, गोमीत सिंग, नूपुर सतीजाला अटक केली होती. त्या आठ जणांच्या एनसीबी कोठडीची मुदत संपत असल्याने त्या सर्वांना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात दुपारी आणले गेले. सुरुवातीला अर्चितकुमारला न्यायालयात हजर केले. त्याच्याकडून एनसीबीने काही प्रमाणात गांजा जप्त केला होता. आर्यन आणि अरबाजच्या चौकशीत अर्चितचे नाव आले होते. तो ड्रग्ज टोळीतील एक मेंबर असल्याचे एनसीबीने न्यायालयात सांगितले.





























































