ओरी हाजीर हो… ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी

कोट्यवधीच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या सालीम शेख याने बॉलीवूड कलावंतांची नावे घेतल्यानंतर पोलिसांनी आज अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत कपूर याची चौकशी केली. त्यानंतर बुधवारी समाजमाध्यम एन्फ्लुएन्सर ओरी याची चौकशी होणार आहे.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने ओरीला 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घाटकोपर येथील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. ओरीच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

एन्फ्लुएन्सर असलेला ओरी ड्रग्ज पार्ट्यां मध्ये सातत्याने सहभागी होत असल्याचा व देशविदेशातील पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरवत असल्याचा संशय आहे. तो दुबईस्थित आलिशहा पारकर याच्या संपर्कात असल्याचे समजते. ओरी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्यास तो कोणाला ड्रग्ज पुरवतो, कोणाकडून ड्रग्स घेतो, यातून त्याने किती पैसा कमावला हेही समोर येणार आहे.

सिद्धांतची पुन्हा चौकशी

ड्रग्ज प्रकरणात आज पोलिसांनी सिद्धांत कपूर याची पाच तास चौकशी केली. अजून बऱ्याच बाबी त्याच्याकडून जाणून घ्यायच्या असल्याने त्याला पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार आहे.

पैसा कमविण्याचे माध्यम काय?

ओरी हा बॉलीवूड कलावंतांमध्ये लोकप्रिय आहे. तो पार्ट्यांमध्ये हमखास दिसतो. त्याच्याकडे अलिशान गाड्या असून तो सातत्याने परदेश वाऱ्या करतो. त्यामुळे त्याचे नेमके उत्पन्नाचे साधन काय? तो अलिशाहव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आहे याचा पोलिसांना तपास करायचा आहे. त्याचे बँक खातेही तपासण्यात येणार असल्याचे समजते.