
सामना प्रतिनिधी, चंद्रपूर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परीक्षेत्रात एका मद्यधुंद वनकर्मचाऱ्याने आज सर्व नियम तोडून वाघिणीचा छळ केला. कोळसा क्षेत्रातील रायबा परिक्षेत्रात एका पाणवठ्यावर दोन पिलांसह पाणी पीत असलेल्या वाघिणीचे फोटो काढण्यासाठी झाडे नावाचा कर्मचारी तिच्याजवळ गेला. दुचाकीवर एक वनमजुरासह हा कर्मचारी तिथे पोचला. पर्यटक वाघिणीला बघत असताना हा कर्मचारी थेट वाघिणीजवळ गेला आणि फोटो काढू लागला.
तिला डिवचण्यासाठी वेगवेगळे आवाज काढू लागला. पर्यटकांच्या जिप्सीवरील गाईडने त्याला हटकले, पण तो मुजोरीवर आला आणि पर्यटकांनाच धमकी देऊ लागला. याच दरम्यान वाघीण पाणवठ्यावरून पिलांसह निघून गेली. पण एका पर्यटकाने या मद्यधुंद कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. वन कर्मचारीच कसा नियम धाब्यावर बसवत आहेत, हे यावरून दिसून आलं.

























































