हैदराबादमधील भयंकर ‘क्रांती’; कुत्र्याच्या पिल्लांची डोकीच उडवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमधील हुसैनी अलम भागात कौर्याच्या सीमा ओलांडणारी भयंकर घटना घ़डली आहे. अंगावर कुत्री भुंकत असल्याने एका दारुड्याने त्या कुत्रीच्या पाच पिल्लांची धारदार शस्त्राने डोकीच उडवली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने काही पिल्लांच्या शरीराच्या अक्षरश: खांडोळ्या केल्या. क्रांती असे या नराधमाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

क्रांतीला दारुचे व्यसन असून तो रोज दारु पिऊन हुसैनी अलम भागात धुडगूस घालायचा. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांच्याही तो अंगावर धावून जायचा. काही दिवसांपूर्वी क्रांती दारु पिऊन या भागात धिंगाणा घालत होता. त्यावेळी रस्त्यावर फिरणारी एक कुत्री त्याच्यावर जोरात भुंकू लागली. यामुळे परिसरातील इतर कुत्रेही तिथे आले व क्रांतीवर भुंकू लागली. हे बघताच दारुच्या नशेत असलेल्या क्रांतीचे डोके फिरले व त्याने क्षणाचाही विलंब न करता रस्त्याच्या आडोशाला बसलेल्या त्या कुत्रीच्या पिल्लांना पकडले. त्यानंतर खिशातील धारदार चाकूने त्याने त्या पाच कोवळ्या पिल्लांची डोकी उडवली व बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. नंतर त्याने पिल्लांच्या शरीराचे लहान लहान तुकडे केले व रस्त्यावर फेकून दिले व तो तिथून निघून गेला. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. त्यामुळे याबद्दल कोणाला काही माहीत नव्हते. पण अचानक एक कुत्री रस्त्याच्या मधोमध येऊन रडत कचऱ्याच्या डब्यातून काहीतरी बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोकांना दिसले. यामुळे काहीजणांना संशय आला व त्यांनी कचऱ्याच्या डब्याजवळ जाऊन बघितले. तेथील दृश्य पाहुन त्यांच्या काळजाचा थरकापच उडाला. कचऱ्याच्या डब्यात पाच कुत्र्याच्या पिल्लांची डोकी त्यांना दिसली. तसेच त्याच्या आजूबाजूला कुत्र्याचे मांसही फेकल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर एका नागरिकाने याबद्दल पोलिसांना कळवले.

दरम्यान, एक दारुडा येथे रोज येतो व कुत्र्यांना डिवचत असतो असे एका दुकानदाराने पोलिसांना सांगितले. त्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी क्रांतीला ताब्यात घेतले. त्यावेळी आपणच कुत्र्यांच्या पिल्लांना ठार केल्याची कबुली त्याने दिली.

summary…drunk man killed five puppies in hyderbad