पुणे – प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुकामेव्याला मागणी

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुकामेवा हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे बाजारात सुकामेव्याची विक्री वाढली आहे. परंतु विक्रीच्या प्रमाणात भाव मात्र गडगडलेले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांतर्फे मागणी कमी होत असली तरी सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात सुकामेवा खरेदी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुका मेव्याचा सर्वाधिक उपयोग होत आहे. यामध्ये बदाम, अंजीर, किसमिस, काजूला अधिक मागणी आहे, या खरेदीसाठी मध्यमवर्गीयांसह गरीबही पुढे येत आहेत. विशेषत: कुटुंबातील लहान मुलांसाठी खरेदी होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा पार्श्वभूमीवर यंदा सप्टेंबरमध्ये भाव वाढलेले नाहीत. रोगप्रतिकारशक्ती सर्वाधिक वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे बदामाचे दर घाऊक बाजारामध्ये प्रति किलो 200 ते दीडशे रुपये किलोने कमी झाले आहेत. प्रामुख्याने अमेरिकन बदामांना अधिक मागणी असते. त्याचे हिंदुस्थान आणि चीनमध्ये मोठे खरेदीदार आहेत. परंतु सध्या अमेरिका आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे चीनने अमेरिकेकडून बदाम खरेदी थांबवली आहे. त्याशिवाय अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अस्थिरता असल्यामुळे मालाची आवक बंद झाली आहे. त्याचा परिणाम दराच्या घसरणीवर झाला आहे.

सध्या बाजारामध्ये दर्जानुसार 700 ते 900 रुपये प्रति किलो बदाम आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांनी सुकामेव्याकडे कानाडोळा करून केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली होती. त्याशिवाय सणांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट चालक आणि लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण यंदा हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू नसून विवाहसोहळे देखील बंद आहेत त्याचाही परिणाम विक्रीवर झाला आहे. जवळपास दहा टक्के दर कमी झाला आहे.

सणांच्या दिवसात गिफ्ट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून मागणी वाढते अनेक विक्रेते पॅकिंग करण्यासाठी माल मागवतात. पण यंदा कोरोनामुळे अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. यंदा दसरा आणि दिवाळीत स्थिती काय राहील याचा अंदाज बांधणे कठीण असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी मालाची ऑर्डर अजूनही दिलेली नाही. ऑक्टोबरमध्ये गिफ्ट पॅकिंग व्यवसाय जोरात सुरू होईल आणि सुकामेवा याला मागणी वाढेल अशी अपेक्षा अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या हॉटेलिंग किंवा बाहेरचे खाणे बंद झाले आहे. त्याचप्रमाणे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लोक सुकामेवा खरेदी करत आहे. त्याचप्रमाणे सुकामेवा हा असा प्रकार आहे की घरातील सर्वांना तो चालू शकतो. येणाऱ्या ग्राहकांपैकी 80 टक्के सर्वसामान्य ग्राहक हे अन्य मसाल्याच्या साहित्याबरोबरच सुकामेवा किमान पाव किलो तरी खरेदी करत आहेत. सध्या त्याची मागणी वाढली असली तरी दर गडगडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे-  अनिस शहाजी आत्तार, अनिस मसाले अँड ड्रायफ्रुट्स पिंपरी भाजी मंडई

आपली प्रतिक्रिया द्या