
सामना ऑनलाईन । मुंबई
स्वातंत्र्यदिन व पतेतीनिमित्त जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आज मंत्रालयात शुकशुकाट होता. आज दिवसभरात केवळ 57 टक्के कर्मचारी कामावर हजर होते. त्यातच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त दिवसभर फिरत होते. त्यामुळे मंत्रालयातील दिवसभरातील नियोजित बैठका व राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदा रद्द करण्यात आल्या. परिणामी मंत्रालय अधिकच सुनेसुने झाले होते.
प्रत्येक वेळेस सलग सुट्ट्या आल्यावर मंत्रालयातील कामकाजावर परिणाम लगेच जाणवतो. बुधवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी होती. गुरुवारी कामकाजाचा दिवस असला तरी शुक्रवारी पुन्हा सुट्टी आहे. शनिवारी तिसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये सुरू आहेत, पण तरीही अनेक कर्मचार्यांनी सुट्ट्या टाकून गावी धाव घेतली आहे. अनेक कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर काही कर्मचार्यांनी ‘हाफ डे’च्या रजेचा अर्ज भरला आणि गावाला रवाना झाले.





























































