अवकाळी पावसाने मंडणगड दापोलीत उडाली दाणादाण, शेतकरी हवालदील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी पहाटे मंडणगड दापोली तालूक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी बागायतदारांसह सर्वांचीच दाणादाण उडाली. या घटनेने नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड आणि दापोलीत मंगळवारी पहाटे 4 वाजल्यापासून अवकाळी पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. सकाळी उठल्यावर सर्वांनी पाहीले तर सगळीकडचे रस्तेच रस्ते ओलेचिंब झालेले दिसत होते. त्यात ठिक ठिकाणचे मातीचे रस्ते निसरडे झाल्याने अपघाताच्या घटना घडल्या.सकाळी नेहमी माॅर्निंग वाॅकला बाहेर पडणा-यांची नेहमीच्या मानाने अवकाळीमुळे चांगलीच संख्या घटली होती. तर या अवकाळीचा फटका मोहरलेल्या आंबा काजू फळ पिकांना बसण्याचा धोका वाढला आहे.

सध्या हिवाळी हंगाम सुरू असला तरी हवेत गारवा तसा कमीच जाणवत होता. त्यामुळे वातावरणीय बदलाची निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकरी बागायतदार चिंतेत होते. अशातच निसर्गाने आपला चमत्कार दाखवत माणसे जशी क्षणा क्षणाला बदलतात ना? तसे निसर्गानेही बदलून आपली किमया दाखवत बरसण्यात सुरूवात केली त्यामुळे निसर्गावर मात करण्याच्या मानव निर्मित प्रयत्नाला निसर्गाने बरसून चांगलाच दणका दिला. अचानक बरसण्याच्या या प्रकाराने अनेकांचे नुकसान झाले आहे. यात शेतकरी आणि बागायतदार यांचे प्रामुख्याने खुपच मोठे नुकसान तर झाले आहेच शिवाय गवत भिजल्याने गुरांना खायला घालण्यात येणारे गवत अर्थातच वैरण भिजल्याने मोठीच पंचाईत झाली आहे. पावसाची परिस्थिती नसल्याने अनेकांनी बाहेर उघडयावर ठेवलेले सामान पावसाच्या पाण्याने भिजल्याने नुकसानीतून कोणीही सुटले नाहीत. हापूस आणि काजूला आलेल्या मोहराला बुरशी जडण्याचा प्रकार घडण्याचा अधिक धोका असल्याने आंबा काजू पिकाची फळधारणा होईलच याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. त्यात फळधारणेचा प्रकार घडलाच तर कमी प्रकार असेल त्यामुळे शेतकरी बागायतदारांना आधार देण्यासाठी शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा देण्याचे काम करायला हवे.

मंडणगडसह दापोलीत रस्ते बांधकाम आदी विविध प्रकारची विकासकामे जोमाने सुरू आहेत. यासाठी पर राज्यातून मजूर म्हणून येथे आलेल्या कामगारांची अचानक कोसळलेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडाली. आभाळाच्या छत्र छायेखाली आपला संसार थाटलेल्या या मजूर कामगारांचा संसार पार भिजून गेल्याने त्यांच्या सामानाचे अतोनात नुकसान तर झालेच शिवाय पहाटेच अवकाळीच्या स्नानाने हुडहुडीही भरली त्यात लहान बालकांना आता अंधा-या रात्रीत न्यायचे कुठे असा यक्षप्रश्न सर्वामोर उभा ठाकला. कोणी उघडयावर ठेवलेल्या त्यांच्या सिमेंट पिशव्या भिजल्या तर कोणी वाळत घालून ठेवलेली सुपारी भिजली तर कोणाच्या सामानाची नासधुस झाली. त्यामुळे या अवकाळीच्या आर्थिक नुकसानीतून कोणीही सुटले नाहीत.

अचानकपणे कोसळलेल्या पावसाच्या बरसातीने शेतकरी बागायतदारांचे मोठेच नुकसान झाले आहे. शासनाने आंबा काजू पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याचे सोपस्कार करण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करावे.
– राजेंद्र जाधव, तिडे ग्राम पंचायत सदस्य आणि प्रगतशिल शेतकरी तिडे, ता. मंडणगड