
सामना प्रतिनिधी । मालवण
शहरातील गवंडीवाडा भागात चिरे वाहतूक करणारा डंपर शेतमळ्यात पलटी झाला. अरुंद रस्त्यावरून डंपर जात असताना शेतमळ्याच्या बाजूने रस्ता खचल्याने हा अपघात झाला.
सुदैवाने चालक व एक कामगार बचावले. हा अपघात मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. चौके येथील मधुकर वराडकर आपल्या मालकीचा चिऱ्यांनी भरलेला डंपर गवंडीवाडा येथील अरुंद रस्त्यावरून घेऊन जात असता रस्ता उजव्या बाजूने खचला गेल्याने डंपर लगतच्या शेतमळ्यात कलंडला. यात वराडकर यांच्यासमवेत असलेला एक कामगार सुदैवाने बचावला. त्यांना किरकोळ दुखापत झाली.






























































