वारजेत बनावट ऑईल पेंटच्या कारखान्याचा पर्दाफाश; 9 लाखांचे ऑईलपेंट जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील वारजे माळवाडीत बनावट ऑईल पेंट तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संबंधित कारखान्यावर छापा टाकून तब्बल 9 लाख रुपयांचे ऑईल पेंट जप्त केले आहे. या प्रकरणी संजय रामप्रित शहाणी (वय 37, तपोधम, वारजे) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार नरेश गोयल (दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद राधेशाम प्रसाद (वय 24, रा. दिल्ली) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद प्रसाद एशियन पेंट कंपनीमध्ये एक्सपर्ट म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका ग्राहकाने वारजे माळवाडीतील दुकानातून एशियन पेंटची खरेदी केली होती. मात्र, तो पेंट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीकडे तक्रार केली. कंपनीने पेंटची तपासणी केली असता, तो पेंट कंपनीचा नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आनंद यांनी वारजेतील त्याच दुकानातून पेंटची पुन्हा खरेदी केली असता बनावट पेंट असल्याचे दिसून आले. त्यानंतर आनंद यांनी शुभम सेल्समध्ये बनावट पेंट विक्री होत असल्याची तक्रार वारजे पोलिसांकडे केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पोलीस उपनिरीक्षक येवले यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संजय एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पेंट तयार करून तो एशियन पेंट व इतर नामांकित कंपन्यांच्या नावावर विकत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शेडमधून 8 लाख 97 हजार 400 रुपयांचा बनावट पेंट जप्त केला आहे.

पेंटसाठी दिल्लीतून कच्चा मालाचा पुरवठा
बनावट पेंट तयार करण्यासाठी दिल्लीतून आरोपी नरेश गोयल कच्चा माल संजय शहाणी याला देत होता. त्यानंतर संजय वारजेमध्ये बनावट पेंट तयार करून विक्री करत होता. हा प्रकार कधीपासून सुरू होता, आरोपींनी कोणाकोणाला पेंट विक्री केली याचा तपास पोलीस करत आहेत.