लेख : एक गाडी बाकी अनाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दुर्गेश आखाडे<<

16 नोव्हेंबर 1996 चा दिवस… सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातून रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पहिली गाडी रवाना झाली. पहिल्या प्रवासात फक्त 29 प्रवासी होते. रत्नागिरीकरांसाठी कोकण रेल्वेची ही हक्काची गाडी…दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी रत्नागिरीकरांकडून हिरावली गेली. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी मडगाव-रत्नागिरी-दादर अशी झाली. आरामात बसून प्रवास करणारा ‘रत्नांग्रीकर’ कोकण रेल्वेत ‘अनारक्षित’ झाला. रत्नांग्रीकरांच्या संतापाचा उद्रेक होत ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर शिमगा झाला.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर या कोकणच्या झुकझुक गाडीचा इतिहासही रंजक आहे. 1995 ला ही झुकझुक गाडी खेडपर्यंत आली. त्यानंतर 1996 ला चिपळूण ते दादर अशी धावू लागली. चिपळुणातून ही गाडी रत्नागिरीत यायला दोन महिन्यांचा कालावधी गेला. 16 नोव्हेंबर 1996 रोजी रत्नागिरी स्थानकातून उद्घाटनाची गाडी सुटली. त्यावेळी गाडीचा फलकही हाताने लिहिला होता. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही ओळख आता त्याच हाताने पुसली गेली. फक्त 45 रुपयांत मुंबई अशा प्रकारे या झुकझुक गाडीची जाहिरात झाली. त्याकाळात दररोज एक डबा बाजूला करून त्याची साफसफाई आणि देखभाल केली जायची. आता संपूर्ण गाडीच देखभालीसाठी मडगावला जातेय. रत्नागिरी ते मडगाव अशा नव्या गाडीची सहा-सात वर्षांपूर्वी घोषणा झाली. सुरुवातीला मंगलोर-मडगाव रत्नागिरीत आणण्याचा प्रयत्न फसला. मग गंडांतर आले ते रत्नागिरी-दादर पॅसेंजरवर. हीच गाडी मडगावपर्यंत जाऊ लागली. सुरुवातीला ओरड झाली. कुणीच लक्ष दिले नसल्यामुळेच कालपरवा उद्रेक झाला. रत्नागिरी जंक्शन रेल्वे स्थानकातून सुटणारी ही एकमेव गाडी होती. आता फक्त हुशारीने ही गाडी फक्त कागदावरूनच आणि कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावरील ‘धावणाऱया रेल्वेगाडीच्या सद्यस्थिती’वरून सुटते. मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजर असा फलक लावून धावणाऱया या गाडीचे दोन गाडी क्रमांक आहेत. 50101/50102 ही मडगाव ते रत्नागिरी अप-डाऊन आणि पुढे 50103/50104 ही रत्नागिरी ते दादर अशी आहे. प्रत्यक्षात रत्नागिरी स्थानकात जेव्हा ही गाडी येते तेव्हा फक्त गाडीचा क्रमांक बदलतो. गाडी तीच राहते. त्यामुळेच एकाच तिकिटात दोन गाडय़ांमधून प्रवास करता येईल अशी ही गाडी आहे. म्हणूनच मडगावपासून प्रवासी या गाडीत बसून येत असल्यामुळे रत्नागिरीकरांना गाडीत शिरायला जागा मिळत नाही. या गाडीला सध्या 18 डबे आहेत, पण रत्नागिरीकरांसाठी एकही डबा शिल्लक राहू नये अशी अवस्था गणेशोत्सवात झालीय. हे चित्र फक्त तुम्हाला आता गणेशोत्सवात आणि त्यानंतर शिमग्यातसुद्धा दिसेल. कारण इतर वेळी या गाडीतून मडगाव ते रत्नागिरीदरम्यान फक्त 50-60 प्रवासी असतात. कमी प्रवासी असले तरी मडगावसाठी कोकण रेल्वेची ‘सादर सेवा’ सुरू आहे. किमान शिमगा आणि गणेशोत्सवात तरी ही गाडी रत्नागिरीतून सोडावी अशी मागणी सुरू आहे. कारण सावंतवाडीतून सुटणाऱया गाडय़ा आहेत, पण जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱया रत्नागिरी स्थानकातून सुटणारी, रत्नागिरीकरांना हक्काने बसायला जागा मिळणारी आता एकही गाडी शिल्लक नाही. ‘एक गाडी बाकी अनाडी’ अशीच अवस्था झालीय. ही गाडी संथगतीने धावते, पण सर्वसामान्य माणसाला ती परवडते. दादरवरून दुपारी 3.35 ला सुटणारी ही गाडी रात्री कधी रत्नागिरीत येईल याची खात्री नसली तरी चाकरमानी त्याच गाडीने येतो. रत्नागिरीत स्थानकावर उरलेली रात्र काढतो आणि सकाळी पहिली बस पकडून घराकडे निघतो. परतीच्या प्रवासातही ही मंडळी आपल्या गावातून शेवटच्या बसने रत्नागिरी रेल्वे स्थानकात येतात. रात्र रत्नागिरी रेल्वे स्थानकावर काढतात. उजाडताच पॅसेंजर पकडण्यासाठी धावतात.