पालिकेच्या 167 भूखंडांचे हस्तांतरण रखडल्याने विकासकामे खोळंबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य सरकारच्या अनास्थेमुळे खासगी जागेत असणाऱ्या तब्बल 167 भूखंडांचे हस्तांतरण रखडले आहे. हे भूखंड ताब्यात आले नसल्याने मुंबईकरांसाठी या जागांवर होणारी उद्याने, मनोरंजन मैदाने, रस्ते, शाळा, पार्किंग अशी अनेक कामे रखडली आहेत. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईकरांसाठी होणाऱ्या विकासकामांची आरक्षणे विकास आराखडय़ात प्रस्तावित करण्यात येतात. ही आरक्षणे शासकीय जमिनीत, पालिकेच्या आणि खासगी मालकीच्या जमिनीवर प्रस्तावित करण्यात येतात. यामधील खासगी जमिनीवरील आरक्षणे पालिकेकडून संपादित किंवा खरेदी करण्यात येतात. अशा खरेदी केलेल्या जमिनींच्या प्रस्तावांचे हस्तांतरण सरकारच्या अनास्थेमुळे प्रलंबित आहेत.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

अतिक्रमणे वाढली, नागरी सेवांवर परिणाम

 मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे जागेचे मूल्य प्रचंड वाढले आहे. त्यामुळे बेवारस मोकळय़ा जागांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. याचा परिणाम नागरी सेवांवर होत आहे. याचा ताण रस्ते, वाहतूक सेवा, स्वच्छता आणि पर्यावरणावर पडून प्रदूषणही वाढत आहे.

 यातच या जागांबाबत निर्णय होत नसल्याने त्यांचे मूल्य दिवसागणिक वाढत आहे, मात्र राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे निर्णय होत नसल्याने पालिकेला याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

असे प्रस्ताव रखडले

 मुंबई जिल्हाधिकारी (शहर)- 44 प्रस्ताव

 उपनगर जिल्हाधिकारी (उपनगर)-123 प्रस्ताव