
>>द्वारकानाथ संझगिरी
शेवटपर्यंत लढणारा, संधी मिळताच आक्रमण करणारा. किंबहुना आक्रमकतेचे बाळकडू पित पित मोठा झालेला ऑस्ट्रेलियन संघ नागपुरात दिसला नाही. आपल्या फिरकी गोलंदाजांनी टाकलेल्या जाळय़ात ते असे अडकले की, ससासुद्धा इतका भेदरून अडकणार नाही. या कांगारूंपेक्षा ससा बरा! असं म्हणायची वेळ आली
नागपूरला ऑस्ट्रेलिया नाक सॉरी फिरणारा चेंडू मुठीत धरून शरण आलं. बॅगी ग्रीन पॅप डोक्यावर घातली की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या रक्तातून वीरश्री वाहते असं म्हणतात. त्यांची दुसऱ्या डावातली फलंदाजी पाहून तो हिरवा रंग सुकलेल्या पानासारखा पिवळा झाला. बरं, त्यांच्याकडे खेळपट्टीवर ताशेरे ओढत बसायला कारण नाही. हिंदुस्थानच्या सहापासून अकराव्या फलंदाजाने धावा केल्या आहेत. अगदी शमीने शमीच्या झाडावरची बॅट काढून धावा करून घेण्याचा योग साधला असं वाटलं. त्याच खेळपट्टीवर त्यांना ना आश्विनचा ऑफस्पिन झेपला ना जडेजाचा लेफ्ट आर्म स्पिन. हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी अतिथी देवो भव या हिंदुस्थानी संस्कृतीचा आदर करत झेल सोडले, पण त्यांच्याकडे लढण्याची काही जिद्द दिसली नाही. एखाद्या स्मिथचा अपवाद सोडा.
इतका कचखाऊ ऑस्ट्रेलियन संघ मी फार क्वचित पाहिलाय. जवळपास पाहिलाच नाही. मंडळी जेव्हा हिंदुस्थानात आली त्यावेळेला ते पूर्ण तयारीनिशी आली. त्यांनी तिथे हिंदुस्थानसारख्या खेळपट्टय़ा तयार केल्या. त्याच्यावर त्यांच्या स्पिनर्ससमोर खेळून सराव केला. आणि हिंदुस्थानात पाऊल ठेवले तेंव्हा त्याना खेळपट्टी कशी असणार हे ठाऊक होतं. ही खेळपट्टी फलंदाजांशी वैर करणारी नव्हती. तसं असतं तर रोहित आणि तळाच्या फलंदाजाच्या धावा झाल्या नसत्या.
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज चांगले आहेत. कमिन्स आणि लायन तर जगातल्या काही उत्कृष्ट गोलंदाजापैकी आहेत. जगात ऑस्ट्रेलियन खेळाडूची एक प्रतिमा आहे. म्हणजे पडला तरी उठून उभा राहण्याचा प्रयत्न करणारा, शेवटपर्यंत लढणारा, संधी मिळताच आक्रमण करणारा. किंबहुना आक्रमकतेचे बाळकडू पित पित मोठा झालेला. आपल्या फिरकी गोलंदाजांनी टाकलेल्या जाळय़ात ते असे अडकले की ससासुद्धा इतका भेदरून अडकणार नाही. त्यांच्याकडे लढायला तंत्र नव्हतं, ना मन, बुडणाऱ्या माणसाची भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. येणारा प्रत्येक फलंदाज मनातून लोटांगण घालत यायचा. धडपडत आल्याची स्वाक्षरी करायचा आणि जायचा.
ड्रेसिंग रूम ही त्यांच्यासाठी जास्त सुखकारक जागा होती. अशी खेळपट्टी आणि असे फलंदाज मिळाल्यावर अश्विन आणि जाडेजाने उत्तम गोलंदाजी करून उखळ पांढर करून घेतलं. अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन फलंदाजासाठी भूलभुलैय्या होती. काय होतं ते नेमपं त्यांना कळत नव्हतं. जाडेजा हा खराखुरा अष्टपैलू खेळाडू झालाय. गरजेला खाली हमखास धावा करतो. गोलंदाजीत तो उगाच बेदीची कलाकुसर दाखवत नाही. त्याला जमणारसुद्धा नाही. पण अशा भारतीय खेळपट्टीवर जे लागतं ते त्याच्याकडे आहे. इतक्या वेगात ओव्हर संपवतो की फलंदाजाला फारसा विचार करायला वेळ देत नाही. मोजकी विविधता पण विकेट्स देतो. त्याने संजय मांजरेकर याच मोठय़ा मनाने काwतुक करावं. त्याने डिवचल्यवर एक वेगळा जाडेजा दिसला.
पूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज अशाच खेळपट्टीवर खेळायचे. 1969 साली. ते 3-1 जिंकून गेले. गोलंदाज कोण? प्रसन्ना, बेदी, वेंकट. क्लोज इन फिल्डर्स कोण? वाडेकर, वेंकट, सोलकर अबिद. तरी जिंकले. कारण चॅपेल, वाल्टर्स, रेडपाथसारखे पुढे जाऊन भिडणारे फलंदाज होते. मद्रास कसोटीत 6 बाद 24 वरून आक्रमण करून रेडपाथने धावसंख्या 150 पुढे नेऊन जिंकून दिलं होत. त्याची नवी थियरी मला गिलस्पीने सांगितली होती. ते भारतीय फलंदाज खेळतात तसे क्रीजचा वापर करत खेळायचे शिकतात. अजून तरी त्यातलं गमभन गिरवतात असं दिसतं. 1959 साली जसु पटेलने 14 विकेट्स घेऊन भारताला कानपूर इथे जिंकून दिलं. त्यांना 105 धावत खोलून टाकलं होत. पुढच्या कसोटीत हार्वे, ओनीलने जसू पटेलला गोलंदाजी विसरायला लावली. ऑस्ट्रेलियन खेळाडू शेपटीवर पडलेला पाय सहन करत नाही. नंतर दंश करतो. हा संघ दंश करेल? तरच मला तो ऑस्ट्रेलियन वाटेल. आपण गाफील राहू नये. पण हे तोतया असायची शक्यता जास्त आहे.
आणि दोन गोष्टी. राहुल हा सुनील शेट्टी याचा जावई आहे. हिंदुस्थानी निवड समितीचा नव्हे. पुढच्या कसोटीत संघात त्याच्याऐवजी गिल यायला हवा याची निवड समितीने नोंद घ्यावी. उपकर्णधारला अमरपट्टा नको. पण अक्षर पटेलला घेणं फायद्याचं ठरलं. त्यांनी खाली केलेल्या धावांनी जी आघाडी दिली त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ मूर्छित झाला. कुठलीही संजीवनी त्यांना उभं करू शकली नाही.





























































