
द्वारकानाथ संझगिरी << [email protected] >>
गेल्या रविवारची दोन शतकं ही दोन धुवाप्रमाणे एकमेकापासून दूर होती.एक आपल्या अजिंक्य रहाणेचं, दुसरं इंग्लडच्या बेन स्टोक्सचं.रहाणेचं शतक हे एकेरी-दुहेरी धावांच्या ‘घामावर’ उभारलेलं होतं. अठ्ठावन एकेरी आणि अकरा दुहेरी धावांच्या कष्टाचं ते फलित होतं. त्याने फक्त पाच चौकार मारले. तेसुद्धा गोलंदाजाने दिलेलं बक्षीस अव्हेरणं बरं नव्हे म्हणून. एरवी जोखीम नावाची गोष्ट त्याने एखाद्या अव्वल ब्रह्मचाऱयाने स्त्रीला दूर ठेवावं तेवढी दूर ठेवली होती. हे शतक एखाद्या तलावाच्या शांत पात्रासारखं होतं.
त्याउलट परिस्थिती बेन स्टोक्सची होती. त्याची फलंदाजी उफाळलेल्या समुद्रासारखी होती. त्याची सुरुवात शांततेत झाली. मग वारं आलं. आठ चौकार आणि पाच षटकारांचा रुबाब त्याचं शतक मिरवत होतं. शतकानंतर त्याची आक्रमकता अधिक वाढली. एक गोष्ट नक्की की, अजिंक्य रहाणेचं शतक धावबुकात शांतपणे पडून राहिलं. बेन स्टोकचं शतक स्मरणातून जायला त्यापेक्षा अधिक अविस्मरणीय घडावं लागेल.
तसं पाहिलं तर दोन्ही शतकांना विजयाचं सौभाग्य मिळालं. रहाणेच्या शतकाचं सौभाग्य कधी धोक्यात आहे असं वाटलंच नाही. उलट जसप्रीत बुमराने अपेक्षित मुहूर्तापूर्वीच मंगलाष्टका सुरू केल्या होत्या. त्याचा तो स्पेल हा वेगळय़ा लेखाचा विषय आहे. बेन स्टोक्सच्या शतकाची तुलना फक्त यमाच्या हातून सत्यवानाचे प्राण सोडवणाऱया सावित्रीशी करता येईल.
रहाणेच्या दृष्टीनं रहाणेचं शतकं महत्त्वाचं होतं. कसोटी क्रिकेटमध्येही रहाणेच्या जागेसमोर का प्रश्नचिन्ह असावं हे मला कळत नाही. पण ते होतं. त्याने गेल्या 32 खेळींत शतकाचा उंबरठा ओलांडला नव्हता. किती तरी वेळ तो उंबरठय़ाच्या आसपास आला, पण ती भाग्यरेषा नाही ओलांडू शकला. या शतकामुळे त्याला काही काळं स्थैर्य मिळू शकेल. तो विश्वचषकात चवथ्या क्रमांकावर खेळला असता तर कदाचित हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्ध लॉर्डस्ला अंतिम सामना खेळू शकला असता असं मला आजही वाटते. पण तो विराट कोहली, रवी शास्त्र्ााrच्या डावपेचाचा भाग कधीच नव्हता. अर्थात रवी शास्त्र्ााr आणि विराट कोहली एवढे अहंकारी आहेत की, त्यांची मते आणि मन बदलत नाहीत. रहाणेने एक लक्षात ठेवावं की, माणूस नाकारता येतो, धावा नाहीत. त्याने धावांचे वजन टाकत राहावं. कधी तरी त्या वजनाखाली मतं आणि मनं चेंगरून जातील. त्याच्या वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण अमरेला हवं तर विचारावं. त्याने तेच केले. त्याला गॉडफादर नव्हता. त्याने धावांना ‘गॉडफादर’ बनवलं.
स्टोक्सचं सर्वच वेगळं आहे. तो त्याच्या देदीप्यमान फॉर्ममध्ये आहे. चेंडू पांढरा असो किंवा लाल, त्याला काही फरक पडत नाही. नशीबही शेवटी यशाकडेच धावतं. प्रत्येक मोक्याच्या वेळी नशिबाने स्टॉक्सला साथ दिलीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो नशिबाचा गुलाम नाही. नशीब त्याचं गुलाम झालय. मग तो लॉर्डस्चा विश्वचषकाचा अंतिम सामना असो किंवा इंग्लंडची ऍशेस मिळवायची केविलवाणी धडपड.
हेडिंग्लेची स्टोक्सची खेळी पर ग्रहावरची होती. मुळात चौथ्या डावात धावांचा पाठलाग करून जिंकणं कधी सोपंच नसतं. चौथ्या डावातला काही खेळय़ा असामान्य असतात. पण त्या पलीकडे दुसऱया ग्रहांवर त्या खेळीला घेऊन जायला जे यशाचं कुंकू लागतं ते नसल्यामुळे त्या इथेच पडून राहतात. चौथ्या डावात मोठय़ा धावांचा पाठलाग करून जिंकलेला संघ मोजायला आता दोन हातांची बोटं लागतात. पण त्यावेळी बऱयाचदा दोन मोठय़ा खेळीमुळे आणि हातात विकेट्स राहिल्यामुळे पाठलाग ‘यम-सावित्री’सारखा होतंच असं नाही. स्टोक्सच्या खेळाच्या खांद्याला खांदा लावतील असे आठवणारे दोन पाठलाग म्हणजे ब्रायन लाराने 1999 साली ऑस्ट्रेलियाला हरवताना केलेला पाठलाग आणि ठोकलेलं शतक. 5 बाद 105 वरून 9 बाद 311 पर्यंत वेस्ट इंडीजला जिंकून देताना त्याने ठोकलेल्या नाबाद 153 धावा अविस्मरणीय होत्या. या वर्षी डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेने केलेला विजयी पाठलाग अंगावर रोमांच उभा करणारा होता. 9 बाद 226 वरून शेवटच्या विकेटसाठी विश्वा फर्नांडोबरोबर 78 धावांची कामगिरी केली होती कुशल परेराने! आणि त्यानेही नाबाद 153 धावा केल्या होत्या.
एकाच वर्षात ही आता स्टोक्सची खेळी! शेवटचा मोठा पाठलाग म्हणजे 70-80 धावा एकटय़ाने अकराव्या खेळाडूबरोबर करणं हे सुनामीची लाट परतवणं आहे. गोलंदाज आग ओकत असतात. कारण त्यांना यश समोर दिसत असतं. मोठे फटके तर मारावेच लागतात आणि जोखमीच्या घोडय़ावर स्वार होऊनच घोडदौड करावी लागते. आणि हे सर्व करताना अकराव्या फलंदाजाला असं सांभाळावं लागतं की, त्याला षटकातले एखाद् -दोन चेंडू खेळावे लागतील. आणि त्यावेळी नॉन स्ट्रायकर एण्डला उभं राहून देवाची प्रार्थना करावी लागते की, अकराव्याला सांभाळ. आणि विरोधी प्रार्थनेपेक्षा आपली प्रार्थना प्रबळ ठरावी लागते. अशावेळी नशीब व फायदा लढणाऱया फलंदाजाला साथ देतं. जशी त्याने स्टोक्सला साथ दिली. कधी एखाद्या सुटलेल्या झेलाने, कधी कर्णधार पेनच्या चुकीच्या डीआरएसच्या निर्णयाने तर कधी पंचाच्या निर्णयाने!
स्टोक्सचं मोठेपण हे आहे की, त्याने 9 बाद 286 वरूनही पुढे 73 धावांचं अंतर असताना त्याने फक्त जिंकण्याचे स्वप्न पाहिलं. मला दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला आठवतात. त्यांना जन्मठेप झाली तेव्हा त्यांनी पहिला निश्चय केला की, तुरुंगातून जिवंत बाहेर पडायचं. सत्तावीस वर्षे हा त्यांचा निश्चय तुटला नाही. हेडिंग्लेच्या मैदानावर स्टोक्सने तेच केले. त्याला कुठलाही श्वास शेवटचा वाटला नाही.
नववा फलंदाज आल्यावर स्टोक्सने थेट आक्रमक भूमिका घेतली. त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. आणि आजकालचे क्रिकेटपटू टी-20, वनडेच्या मुशीतून तयार होत असल्यामुळे आक्रमक भूमिकेत शिरणं या पिढीला सोपं जातं. त्यात स्टोक्स लहान कुटुंबातून आलेला आहे. लढाऊ म्हणजे किती लढाऊ? त्याची आई क्रिकेट खेळायची. ती एकदा गरोदरपणात चक्क सातव्या महिन्यानंतर खेळली. वडील वीरश्रीच्या बाबतीत आणखी दोन पावले पुढे होते. एकदा रग्बी खेळताना त्यांच्या एका बोटाला फ्रॅक्चर झालं. पुढची मॅच खेळणं अशक्य होतं. त्यांनी काय केलं असेल? त्यांनी ते बोटच कापून टाकलं. स्टोक्सच्या मैदानाबाहेरच्या वीरश्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण तीच ‘हिंसक वृत्ती’ सत्कारणी लावता येते हे त्याने मैदानावर दाखवले. ही नुसती कसोटी त्याला जिंकायची नव्हती, ऍशेसच्या आशा जिवंत ठेवायच्या होत्या. इंग्लंडसाठी ऍशेस हे ‘नाक’ आहे. ते खाली जाऊन चालत नाही. स्टोक्सला मर्यादित षटकातल्या फटकेबाजीची सवय असली तरी कसोटीत मर्यादित षटकांचे क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजीचे नियम नसतात. त्यामुळे सीमारेषेवर गस्त घालणाऱया क्षेत्ररक्षणावर मर्यादा नसते. कधी त्यांच्यामधून, कधी त्यांना ओलांडून स्टोक्सने फटके मारले. या पाठलागाच्या सुरुवातीला दबाव कमी असतो. कारण सर्वांच्या मनाची पराभवाची तयारी झालेली असते. दबाव वाढतो टार्गेट जवळ आल्यावर. जवळ आल्यावर हात हलवत परतणे भयंकर जड जाते. या माणसाने आठ धावा हव्या असताना षटकार ठोकला. तोसुद्धा लाँगऑफला मार्कस हॅरिस उभा असताना. हा उद्दामपणा होता. तो त्याने दाखवला. तो हीरो झाला. तो त्या क्षणी बाद झाला असता तर तो खलनायक ठरू शकला असता. सर्वांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे ‘वाभाडे’ काढले असते. पण या मोसमात नशीबही त्याच्यावर भाळलंय. ते लॉर्डस्ला दिसलं आणि आता हेडिंग्लेला. वनडे असो किंवा कसोटी सामना, विश्वचषक किंवा ऍशेस, इंग्लंडचा विघ्नहर्ता स्टोक्सच असतो.



























































