…अन् विराटचा पोवाडा गायला गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी 

विराट कोहली मेलबर्न मैदानावर भावनाविवश झाला. तो भावना लपवणारा माणूस नाही. राग, दुःख, प्रेम, वगैरे भावना, त्याचा चेहेरा आणि बऱयाचदा अख्खं शरीर पटकन बोलून दाखवते. याबाबतीत तो टेनिसपटू मॅकेनरोसारखा आहे. आनंद बऱयाचदा डोळय़ांतून वाहिलेल्या अश्रूतून जाणवतो. त्या दिवशी त्याचे अश्रू बरेच काही बोलले.

गेल्या दोन-तीन वर्षांतील त्याचं नैराश्य, अनेकांनी त्याच्या मनावर ओढलेले, टीकेचे शाब्दिक फटके. ते व्रण घेऊन तो काही दिवस खेळत होता. क्रिकेटमध्ये अंधारात चाचपडत असताना, महान क्रिकेटपटू दिव्य प्रकाशापासून फक्त एक मोठी खेळी दूर असतो. ती खेळी त्याला सापडली. विजयाने अशक्यतेपासून शक्यतेपर्यंत प्रवास शेवटच्या 8 चेंडूंत केला, पण त्याचा मार्ग विराटने आधीपासून तयार केला होता.  त्याची आणि हिंदुस्थानी संघाची रात्र त्यामुळे उजळून निघाली. त्यामुळे इतरांचा प्रकाश झाकोळला गेला. त्यांनीही त्यांचे आकाशकंदील आपल्या परीने पेटवले होते. विशेषतः गोलंदाज जमातीने.  अर्शदीपने काय चेंडू स्विंग केले! दोन्ही स्विंग त्याच्याकडे आहेत. त्याने थेट बाबर नावाचा एक्काच बाजूला काढला. त्याचा टप्पा असा होता की, फलंदाज ना फ्रंट फूटवर मारू शकत ना बॅक फूटवर. मुसक्या बांधणे या शब्दात बसणारी ती गोलंदाजी होती. भुवनेश्वर कुमारने आशिया कपमध्ये प्रचंड रट्टे खाल्ले. तो संपला अशी सार्वत्रिक भावना होत होती. मेलबर्नवर तो फटक्यातल्या बाणासारखा उसळला.  त्याला त्याचा टप्पा सापडला. हार्दिक पांडय़ा हा टी-20 चा योग्य अष्टपैलू खेळाडू आहे हे त्याने आणखीन एकदा दाखवून दिलं. 3 बळी आणि 40 धावा. कोहलीच्या खेळीने त्याच सामनावीराचे ऍवॉर्ड हिरावलं गेलं. आश्विन फिल्डिंग करतो तेव्हा, ‘हा का इथे आहे?’ असं काही वेळा वाटतं, पण त्या दिवशी अनुभव कसा मदतीला येतो याचं मूर्तिमंत उदाहरण त्याने दाखवलं. चाणाक्षपणे, वाइड बॉल सोडला आणि एक धाव रोखायला फिल्डर पुढे आल्यावर वरतून अलगद फटका मारला. हिंदुस्थानच्या  विजयात या सर्वांचाही वाटा होता. किंबहुना अनुभव हिंदुस्थानला पैलतीरावर घेऊन गेला आणि पाकिस्तानला तळय़ाशी. नवाज गोंधळला होता. त्याने 3 चेंडू अधिक टाकले. विराटने कंबरेवरचा चेंडू प्रेक्षकांत फेकल्यावर हिंदुस्थानला फ्री हिट मिळाली. त्यावर विराट बोल्ड झाला, पण आपण बाद नाही हा विचार इतका मनात पक्का होता की, तो 3 धावा धावला. शेवटी क्लास आणि अनुभव जिंकला.  ‘जंजीर’ पाहिल्यावर आपण अमिताभच्या प्रेमात पडतो. अगदी प्राण, अजितने उत्कृष्ट अदाकारी केल्यावरही तसं विराटच्या खेळीच झालं. म्हणून त्या दिवशी विराटचा पोवाडा गायला गेला, पण इतरांचा कवितेवर हक्क आहे.