कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडविण्याचा ई-मेल, तपासात पोलिसांना ना स्फोटके.. ना धमकी देणारे सापडले

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देऊ… दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा… अशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर धमकी आल्याने आज जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले.

बॉम्बशोधक आणि नाशक पथक, जिल्हा पोलीस दल आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत सर्वत्र शोधाशोध सुरू केली. तब्बल तीन-चार तासांच्या शोधमोहिमेत पोलिसांना ना आरडीएक्स सापडले… ना ई-मेलवरून धमकी देणारा… फक्त हा ई-मेल चेन्नई येथून पाठविल्याचे दिसून आले. त्यातील काही वक्तव्ये पाहता या धमकी देण्यामागचे गौडबंगाल निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वर्दळ आणि काल रात्रीपासून ठिय्या मारलेल्या शेकडो आंदोलकांमुळे अगोदरच तणावपूर्ण वातावरण होते. त्यातच सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब फुटणार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, या आशयाचा ई-मेल धडकला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून याची माहिती मिळताच, तातडीने जिल्हा पोलीस दल, कोल्हापूर महापालिकेचा अग्निशमन विभाग आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तत्काळ दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱयांना बाहेर काढून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. महसूल, पुनर्वसन, ग्रामपंचायत, निवडणूक आदी विभागांसह जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीच्या ठिकाणीही कसून शोधाशोध करण्यात आली.

यावेळी कामासाठी आलेले नागरिक आणि कर्मचारी भीतीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडले. सर्व विभागांत जाऊन अग्निशमन, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल यांच्याकडून कसून तपासणी करण्यात येत होती. हा ई-मेल कोठून आला, याचा पोलीस तपास करीत आहेत.

‘त्या’ मेलमधील मजकूर तर गोंधळात टाकणारा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास आज धमकीचा आलेला ई-मेल चेन्नई येथून अर्णा अश्विन शेखर या व्यक्तीच्या नावाने आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रसाद सकपाळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या मेलमधील मजकूर गोंधळात टाकणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.