
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त प्रचारसभा लातूर जिल्हय़ात औसा येथे 9 एप्रिल रोजी झाली होती. या सभेत मोदी यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे.
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि बालाकोटवर हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना आपले मत समर्पित करा, असे आवाहन या प्रचारसभेत मोदी यांनी नवमतदारांना केले. हे वक्तव्य निवडणूक आचार संहितेचा भंग करणारे नाही असे आयोगाने स्पष्ट केले. हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारे असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती, परंतु या वक्तव्याची चिकित्सा आयोगाने केली. त्यात या वक्तव्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे आयोगाला आढळून आले आहे.



























































