
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकसभा निवडणूक संपेपर्यंत मुंबईची कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त देवेन भारती हेच सांभाळणार आहेत. भारती यांना निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी राज्य सरकारने केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बढती मिळेपर्यंत देवेन भारती यांच्याकडेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कायम राहणार आहे.
15 एप्रिल 2015मध्ये देवेन भारती यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून भारती यांनी यशस्वीपणे कामकाज पाहिले. त्यांचा मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्त पदी तीनपेक्षा जास्त वर्ष कार्यकाळ झाला आहे. शिवाय ते अपर पोलीस महासंचालकाच्या बढतीसाठी पात्रदेखील आहेत. परंतु मुंबईतील त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव लक्षात घेता निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रहावी यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे त्यांच्या मुदतवाढीची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही निवडणुकीनंतर अपर पोलीस महासंचालक पदी बढती मिळून त्यांचीही बदली होणार आहे.



























































