
मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मोलाची साथ मिळत आहे. मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांपासून आपला मोर्चा पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर विलेपार्ले येथील पेशवा मंडळाचा बाप्पा या वर्षी चक्क केळीच्या खांबाच्या लगद्यातून अवतरणार आहे तर साकीनाका येथील बाप्पा तुरटी आणि टिश्यू पेपरच्या लगद्यातून अवतरणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा झाला. आज देशभरात कोरोना नियंत्रणात आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याला परवानगी दिली आहे. ‘पीओपी’च्या मूर्तींना 2020 पासून बंदी असली तरी यावर्षी ‘पीओपी’ मूर्ती बनवण्याची परवानगी देण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. त्यानुसार या वर्षी पूजेसाठी ‘पीओपी’च्या मूर्ती बसवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना भक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तीच वापराव्या, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना उंचीचे बंधन नसले तरी घरगुती ‘पीओपी’ मूर्ती 2 फुटांची असावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 2023 पासून ‘पीओपी’ मूर्तीला बंदी असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष इतका कालावधी लागतो. विलेपार्लेच्या पेशवा गणेशोत्सव मंडळाची या वर्षाची 11 फुटी मूर्ती ही केळीच्या खांबापासून बनवलेली आहे. जानेवारीच्या आधीपासून केळीचे खांब सोलून त्याचा लगदा बनवावा लागतो. त्यात गम, टिश्यू पेपर आणि खडूची पावडर मिक्स करून तो लगदा उन्हात अनेक दिवस चांगला सुकवून घ्यावा लागतो. त्यानंतर ही मूर्ती तयार केली जाते. लहान मूर्ती 18 इंचाची मूर्ती तर मोठी मूर्ती 11 फुटांची बनवली जाते.
साकीनाका येथील ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाची तुरटीची मूर्ती ही 13 फुटाची आहे. याच मंडळाने गेल्या वर्षी चवळीपासून मूर्ती बनवली होती. यंदा जवळपास 55 सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्तीच्या ऑर्डर दिल्या आहेत, अशी माहिती विलेपार्ले येथील मूर्तीकार राजेश मयेकर यांनी दिली.
केंद्र सरकारने 2020 पासून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीओपीवर बंदी घातली आहे. तेव्हापासून मुंबईतील मंडळांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या 12 हजारांहून जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शाडूची माती तसेच इतर पर्यावरणपूरक घटकांपासून मूर्ती बनवली जात आहे. या वर्षी 40 टक्के मूर्ती या पर्यावरणपूरक घटकांपासून बनवल्या जात आहेत, अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायला मंडळ तयार आहेत. मात्र, शाडूची माती ही गुजरातहून मागवावी लागते. ती महाग असते. त्यासाठी सरकारने सबसिडी उपलब्ध करून द्यावी. त्यात शाडूच्या मूर्ती या खूप उंच बनवता येत नाही. ती मर्यादाही आहे. दरम्यान, पीओपीत असलेले घातक घटक काढून टाकून केवळ पीओपीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवता येईल का, यासाठी आम्ही आयआयटीसारख्या संस्थांच्या संपर्कात आहोत.
– अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती


























































