
सामना ऑनलाईन । मुंबई
एसटीची प्रतिष्ठत सेवा म्हणून गणल्या गेलेल्या ‘शिवनेरी’चे भाडे कमी केल्याने तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर शुक्रवारपासून एसटीच्या आठ नवीन शिवनेरी सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या फायद्याच्या असलेल्या मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 20 शिवनेरी बसेस सुरू करण्याचा संकल्प परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोडला आहे. त्यापैकी 8 बसेस मुंबई-पुणे मार्गावर आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आल्या असून त्यामुळे या मार्गावर तब्बल 32 नव्या फेऱयांची भर पडली आहे.
गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर दिवसभरात 272 फेऱया सुरू असून त्यामध्ये आजपासून सुरू झालेल्या 32 फेऱयांची वाढ झालेली आहे. यामुळे दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गांवर आजपासून 304 फेऱया दररोज चालणार आहेत. त्याचा फायदा या सेवेचा लाभ घेणाऱया असंख्य प्रवाशांना होणार आहे. गेल्या महिनाभरात तिकीट दरात कपात केल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत एका महिन्यात अंदाजे 21 हजार प्रवाशांची वाढ झालेली आहे.
महिलांसाठी आरक्षण देणारी ‘शिवनेरी’
शिवनेरीमध्ये महिला प्रवाशांसाठी 3 ते 12 अशी दहा आसने आरक्षित आहेत. साहजिकच सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी महिला प्रवाशांची पहिली पसंती ही शिवनेरी आहे. वाढलेल्या फेऱया व कमी झालेले तिकीट दर याचा जास्तीतजास्त फायदा प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.



























































