भाजपचे सध्याचे नेतृत्व कोत्या मनाचे, खडसे यांचा घणाघात

1371

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती. त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांवर टीका केली आहे. मुंडेंसारखे नेतृत्व राहिले नाही, सध्याचे भाजपचे नेतृत्व हे कोत्या मनाचे असून त्यांना सामूहिक नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी जिंकणार्‍या उमेदवारांना तिकीट न दिल्याने जागा गेल्या, असेही खडसे म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले की ‘गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सूर्यभानजी वहाडणे पाटील, अण्णा डांगे, नितीन गडकरी यांनी पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न केले. जनसंघ किंवा भाजप हा शेटजी भटजी पक्ष ही प्रतिमा बदलून ओबीसींचा पक्ष अशी प्रतिमा निर्माण करण्यात या नेत्यांना यश आले. पक्ष वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक अडचणींना तोंड दिले, उपेक्षा सहन करावी लागली त्यांच्याच कष्टामुळे भाजपला महाराष्ट्रात चांगले दिवस आले. त्यांचा सहकारी असल्याचा मला अभिमान आहे. दुर्दैवाने मुंडे आज हयात नाहीत. पक्षाचे चांगले दिवस आले आणि ते नाहीत. संघर्षाच्या काळात त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. राजकीय संकटाच्या काळात मुंडे साहेबांनी नेहमीच पाठिंबा दिला. आज जर मुंडे असते तर आमची अशी परिस्थिती झाली नसती. मुंडे यांनी कार्यकर्त्यांना पुढे नेले. मुंडे यांनी पाठीत कधीच खंजीर खुपसला नाही’, असेही खडसे म्हणाले.

ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता होती तिथे त्या उमेदवाराला तिकीट गेले नाही असे खडसे म्हणाले. तसेच “मुक्ताईनगरमध्ये अडचणीच्या कालखंडातही  मी 30 वर्षे सातत्याने निवडून येत होतो. तिथे निवडून येण्यासारखी परिस्थिती असताना मला तिकीट दिले नाही. रोहिणी तिकीट मागत नसताना तिला उमेदवारी दिली गेली. ही जागा धोक्यात येऊ शकते असा इशारा देऊनही पक्षाकडून ऐकण्यात आले नाही. राजकारणात मी 40 वर्षे आहे. यापैकी 30 वर्षे मी मुंडे यांच्या सहवासात होतो. मुंडे मोठ्या मनाचे नेते होते. सध्याचे नेते खुल्या मनाचे नाहीत. पक्षातील काही नेत्यांमध्ये द्वेष आणि मत्सराची भावना आहे.” पक्षातील सर्व नेते चांगले आहेत म्हणूनच पक्ष सुरू असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

कालायः तस्मैः नमः

एवढे काही होत असताना जसा काळ सुरू आहे त्याला नमस्कार केला पाहिजे अशी भूमिका आपण स्वीकारली आहे असे खडसे म्हटले. तसेच “एका महिन्यात आपण 80 तासांसाठी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पाहिला. त्यांचे गेलेले सरकार पाहिले, तसेच विरोधी पक्षाचे सरकार झालेलेही पाहिले. यात एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे कशासाठी?” आपल्याला या प्रकारची वागणूक का मिळाली हे वारंवार विचारूनही याचे उत्तर न मिळाल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली. तसेच आपली चूक असताना ज्या मुंडे साहेबांनी सांभाळून घेतले, ते मुंडे साहेब आज हयात नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. तसेच मुंडे साहेबांकडे हा जो मोठेपणा होता तो हल्लीच्या कोत्या मनाच्या नेत्यांमध्ये नाही अशी टीका त्यांनी स्वपक्षीयांवरही केली आहे. सध्याची स्थिती ही सामूहिक नेतृत्वाची नाही असा घणाघात खडसे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या