‘पुन्हा येईन’ या अहंपणामुळेच सत्ता गेली, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षामधून अनेक लोक बाहेर पडत असल्यानेच भाजप नेते पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं म्हणत आहेत. पुन्हा येईन या अहंपणामुळेच राज्यातील भाजपची सत्ता गेली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला.

राज्यातील राजकारण आता बदलत आहे. हे सरकार पडणार, असे विरोधकांना कितीही वाटत असेल तरी तसे होणार नाही. हे सरकार टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकारची पाच वर्षे अशीच निघून जाणार आहेत आणि भाजपला पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणत बसावे लागणार आहे, असा टोला खडसे यांनी जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत लगावला.