भाजपला जबर हादरा, खडसे उद्या राष्ट्रवादीत!

माझा गुन्हा काय? असा प्रश्न मी गेली कित्येक वर्षे विचारतोय. देवेंद्र फडणवीसांनी तर माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करायला लावला. चार वर्षे मी मानसिक छळ सहन करतोय. देवेंद्र फडणवीसांमुळेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. फडणवीसांच्या छळछावणीतून बाहेर पडण्यासाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला अशी तोफ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी डागली. खडसे यांनी आज अवघ्या दोन ओळींचे राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आणि शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. खडसेंचा राजीनामा भाजपला जोरदार हादराच आहे.

राजीनाम्याचे पत्र पाठवल्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या संतप्त भावनांना मोकळी वाट करून दिली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर अशा कितीतरी नेत्यांसोबत पहिल्या फळीत आपण भाजपचे काम केले. पक्षवाढीसाठी किती खस्ता खाल्ल्या. भाजपनेही मला अनेक मानाची पदे दिली. माझा भाजपवर वा इतर कोणाही नेत्यावर रोष नाही. माझा रोष फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे अशी तोफ त्यांनी डागली.

देवेंद्र फडणवीस यांनी माझा मानसिक छळ केला. माझ्यावर विनयभंगाचा खटला दाखल करण्यासाठी दबाव आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. जमीन घोटाळ्यात त्यांनी माझी चौकशी लावली. या सगळ्यातून मी सहीसलामत बाहेर पडलो. माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली. यामुळे मला बदनामी सहन करावी लागली. याची कबुली देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. हे सर्व करून त्यांना काय मिळाले असा सवालही खडसे यांनी केला. त्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस वा शिवसेनेने माझा राजीनामा मागितला नाही. मग कोणाचीच मागणी नसताना माझा राजीनामा का घेण्यात आला, याचे उत्तर मला कुणीही आतापर्यंत दिले नाही. मी केंद्रीय नेतृत्व वा प्रदेश कार्यकारिणीवर नाराज नाही. केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझ्यावर भाजप सोडण्याची वेळ आली असेही खडसे म्हणाले.

माझ्या कुटुंबालाही मनस्ताप झाला
माझ्या मागे भ्रष्टाचारविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी पह्न करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. मी 15 दिवसांपूर्वी खोटय़ा खटल्यातून बाहेर पडलो. मात्र यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मनःस्ताप भोगावा लागला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्यासोबत कुणीही नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी एकटाच जात आहे. माझ्यासोबत भाजपचा कोणीही आमदार वा खासदार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. रावेरच्या खासदार रक्षा खडसे या भाजप सोडणार नाहीत. निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका नाही
ज्या राष्ट्रवादी र्कॉग्रेसवर आपण टीका केली त्याच पक्षात जात आहात असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपण कधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका केली नसल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता म्हणून आपण तत्कालीन सरकारवर टीका केली असेही ते म्हणाले.

पायाचे दगड का निसटताहेत याचा भाजपने विचार करावा, मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष का सोडला. यशाची शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड का निसटत आहेत? नवे अंपुर फुटताना मुळे का उखडत आहेत याचा विचार भाजपने करावा, असा टोला लगावतानाच एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीत स्वागत आहे, त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एनडीएमधून अगोदर शिवसेना बाहेर पडली. त्यापाठोपाठ अकाली दलही बाहेर पडले. आता भाजपमधून कार्यकर्तेही बाहेर पडत आहेत याचा त्या पक्षाने विचार करण्याची गरज आहे. जे चांगले लोक येतील त्यांचे शिवसेनेत स्वागत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवले
पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावे लागते. नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवले आहे. त्यांनी भाजप सोडणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संभाजीनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ खडसे यांना माझ्याविषयी तक्रार होती तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला हवे होते. पण तसे न करता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. गुन्हे दाखल करण्यासंदर्भात ते बोलले आहेत. यावर मी योग्य वेळी बोलेन असे फडणवीस म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या