
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अवघ्या 80 तासांत कोसळल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपातील अस्वस्थता आणि संतापाला वाट मोकळी करून दिली. सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली असती तर भाजपचे आणखीन 25 आमदार वाढले असते. पक्षासाठी झटणार्यांना हटवले तेच आता भोवतेय, अशा शब्दांत त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली. सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर असलेले पुरावे हे रद्दीचा भाव वाढल्याने रद्दीत विकले, अशा शब्दांत खडसे यांनी भाजपला घरचा अहेर दिला.
विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त एकनाथ खडसे आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. 2014 साली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सामूहिक निर्णय घेतला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे त्या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय माझा वैयक्तिक नसून तो पक्षाचा होता असे ते म्हणाले.
फडणवीसांच्या नेतृत्वावर निशाणा
विनोद तावडे, बावनकुळे आणि माझ्यासारख्याला घेऊन निवडणूक लढली असती तर पक्षाच्या 25 जागा आणखी वाढल्या असत्या, असा दावा खडसे यांनी यावेळी केला. पक्ष कधीच चुकत नाही. ज्यांच्या हातात धुरा दिलेली असते त्यांचा निर्णय चुकू शकतो, असे सांगत खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचे कारण काय, असा सवाल करतानाच माझी राजकारणातील 40-42 वर्षांची तपश्चर्या आहे. माझा अधिकार होता. कठीण कालखंडामध्ये आम्ही पक्ष उभा केला असल्यामुळे पक्षाच्या विरोधात आम्ही जाऊच शकत नाही. पण पक्षाच्या यशासाठी ज्या लोकांनी मदत केली अशा लोकांनाच बाजूला ठेवल्याने निवडणुकीवर परिणाम झाल्याचा संतापही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
महायुतीत पडलेली फूट दुर्दैवी
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर चूक सुधारण्याचा प्रयत्न झाला आणि सहा महिन्यांनंतर पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र आले व युतीच्या माध्यमातून सरकार चालवले. 2019 मध्येही महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले होते, पण दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत फूट पडली. मागील महिनाभरात ज्या घडामोडी घडल्या त्या आपण पाहिल्या आहेतच, पण स्पष्ट बहुमत असूनही महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही याबद्दल खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.




























































