छगन भुजबळांमुळे मिंधे गट अस्वस्थ, मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेमुळे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ आक्रमक झालेत. ते सातत्याने घेत असलेल्या भूमिकेमुळे मिंधे गटातील आमदारांच्या अंगाचा तीळपापड झाला आहे. मिंधे गटातील आमदारांनी त्यांच्याच सरकारमधील मंत्रीपदावर असलेल्या भुजबळांवर टीका केली असून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना दिल्यापासून ओबीसी नेत्यांकडून वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटत आहेत. छगन भुजबळ यांनी त्या अधिसूचनेतील ‘सगेसोयरे’ या शब्दावरच आक्षेप घेऊन ओबीसी बांधवांनी मोठय़ा प्रमाणात या अधिसूचनेवर हरकती नोंदवाव्यात असे आवाहन केले. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असे मत राज्याचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मिंधे गटाचे आमदार संजय गायकावाड यांनी भुजबळांवर टीका करताना म्हटले आहे की, छगन भुजबळांनी स्वीकारलेली तिरस्काराची भूमिका योग्य नाही. अशी भूमिका घेणाऱ्या भुजबळांना मंत्रिमंडळात ठेवूच नये, त्याला बाहेर काढावे असे गायकवाड यांनी म्हटले. मंत्री म्हणून भुजबळांनी राज्यातील सगळ्या लोकांच्या हिताची गोष्ट करणे गरजेचे असताना ते एका समाजाचा तिरस्कार करत आहे. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला काही फरक पडत नाही असे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

मिंधे गटाचे दुसरे नेते असलेल्या संजय शिरसाट यांनीही भुजबळांबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटलंय की, काहींना राजकारण करायचंय, नेते बनायचे आहे. थेट माध्यमांसमोर जाऊन सरकार चुकतंय असं कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही, सरकारमध्ये असून जर कोणी असे म्हणत असेल तर त्या व्यक्तीचा राजीनामा मागणं गैर नाही.

दरम्यान हे प्रकरण अजून वाढू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्री आणि आमदारांना जरांगे पाटील यांच्याबाबत कोणी प्रतिक्रिया देऊ नये अशी तंबी दिल्याचे कळते आहे.