खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निविष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीच ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा पवार, खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, गणपत गायकवाड, किसन कथोरे, गिता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगर पालिका आयुक्त बिपीन शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात बियाणे, खते यांची प्रतवारी चांगली ठेवणे गरजेचे आहे. भातशेती बरोबर, भाजीपाळा यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवीन संशोधन करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. जिल्हयात खत, बियाणे यांचा काळाबाजार रोखणेसाठी 6 भरारी पथके नेमली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निशिगंधा, गुलाब, मोगरा या पिकांना खास बाब म्हणून 1 वर्षात अनुदान देणेचा मापदंड मंजूर आहे. त्याचप्रमाणे सोनचाफा या फुलपिकाचा समावेश करुन सलग लागवड करणे व मंजुरीचा प्रस्ताव राज्यस्तरावर पाठविला आहे. कृषी अधिक्षक माने यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या