
संवैधानिक तरतुदींमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, परंतु देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगानेच राजकीय पक्षांच्या रॅलींवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेची भीषणता देशातील लोक अजूनही विसरलेले नाहीत. मागच्या एप्रिल-मे महिन्यात तर रुग्णालयात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला. आता देशासमोर कोरोनाची तिसरी लाट आहे. तज्ञांच्या मते ओमायक्रोन पुढे जाऊन कोणते नकीन रूप घेईल हे कोणालाही माहिती नाही. देशातील कोरोना संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रचार सभा थांबवाव्यात, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
आजच युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करावा. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना टीव्ही, रेडिओ इत्यादी संपर्क माध्यमांवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी टाइम स्लॉट वितरित करावेत जेणेकरून सर्व पक्षांना प्रचाराची समान संधी मिळू शकेल. राजकीय नेत्यांच्या मोठय़ा रॅलींऐवजी कोरोना नियमांचे पालन करून प्रचार करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना गेहलोत यांनी केल्या आहेत.
कॉँग्रेसने पाच राज्यांतील प्रचार सभा पुढे ढकलल्या
देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणूक प्रचार सभा पुढे ढकलल्या आहेत. त्या त्या राज्यांमधील स्थानिक नेत्यांनी कोराेना परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी दिली.
योगी आदित्यनाथ यांचा नोएडातील कार्यक्रम रद्द
नोएडातील कोरोनाच्या काढत्या प्रकरणांमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही येथे होणारी रॅली रद्द केली आहे.
भाजप व्हर्च्युअल रॅलीसाठी तयार
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने आदेश दिल्यास भाजप व्हर्च्युअल रॅली घेण्यास तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी सांगितले.


























































