
सामना प्रतिनिधी, मुंबई
निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने लष्करी अधिकारी अथवा जवानांचा फोटो वापरू नका. जर कोणत्या पक्षाने असे केल्याचे आढळले तर त्या पक्षावर तसेच उमेदवारावर कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबीच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली आहे.
पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर काही राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी जवानाचे फोटो वापरले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना पत्र पाठवून निवडणुकीमध्ये लष्करी अधिकारी किंवा जवानांचा फोटो वापरू नका असे निर्देश दिले.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार?
अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातील खात्रीलायक सूत्रांनी रात्री उशिरा दिली. राजधानीतील विज्ञान भवनातील हॉल क्रमांक 1 मध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणुकीच्या घोषणेवेळी प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या हॉलची निवड करण्यात आली आहे.































































