23 मई, काँग्रेस फिर डिब्बेमे गई! पश्चिम उपनगरात निवडणूक फिवर चढू लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोठा वेग आला नसला तरी मुंबई उपनगरात आता विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार घोषणा युद्ध मात्र पेटताना दिसत आहे.मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी देताना मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलेले संजय निरुपम आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निरुपम यांनी “23 मई ,बीजेपी घर गई” अशी घोषणा देत.शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांना डिवचले होते.त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता “23 मई ,काँग्रेस फिर डिब्बेमे गई” अशी घोषणा देत निरुपम यांच्यावर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केली आहे.उत्तर मुंबईतून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसने लोकसभेची तिकीट देण्याची घोषणा करताच “जे काँग्रेस नेत्यांना जमले नाही ,ते अभिनेते आणि अभिनेत्रींना कसे जमणार ? असा संतप्त सवाल युतीच्या कार्यकर्त्यांसह उपनगरातील मतदार करीत आहेत.

आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मुंबईत काँग्रेस नेत्यांना आणि पक्षाला जोरदार कसरत करावी लागत आहे. 2014च्या महाराष्ट्रातील दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली दिसत नाही.त्यामुळे लोकप्रियता असणाऱ्या उमेदवाराचा शोध हि काँग्रेसपुढची मोठी समस्या ठरली आहे.मुंबईच्या उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकार्यांपुढे काँग्रेसची नवी शक्कल कितपत टिकाव धरणार हे आता मतदारच मतदानाने ठरवणार आहेत. शिवसेना -भाजप युतीच्या भक्कम भिंतीला टक्कर देण्याची क्षमता नसल्यानेच काँग्रेस नेते आकर्षक आणि शेलकी घोषणाबाजी करीत गेलेली पत पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.त्याला समर्पक उत्तर देण्यात आता युतीचे कार्यकर्तेही मागे राहिलेले नाहीत. देशात उसळलेली देशाभिमानाची लाट शेलक्या आणि उथळ घोषणाबाजीवर तरू पाहणाऱ्या काँग्रेसला अपयशाच्या तीरावर वाहून नेणार असे आता तरी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील चित्र आहे.

गोविंदाचा “निष्क्रिय तडका” आजही मतदार विसरलेले नाहीत. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काही वर्षांपूर्वी मतदारांनी लोकप्रियता आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर बॉलिवूड स्टार गोविंदाला काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत पाठवले होते. पण मौनी खासदार गोविंदाने मात्र मतदारांची घोर निराशा केली होती. राम नाईक यांच्यासारख्या कार्यसम्राट नेत्याला पराभूत केल्याचे शल्य या मतदारसंघातील मतदारांना अजूनही सलत आहे. शिवाय या मतदार संघातील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या स्तुत्य विकासकार्यापुढे इथे अन्य कुणाचीही डाळ शिजणार नाही असाच मतदारांचा मूड सध्या आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला गोविंदासारखे यश मिळेल का? हा सध्या यक्षप्रश्नच आहे. उत्तर मुंबईचे मतदार गोविंदाकडून आलेल्या वाईट अनुभवामुळे “दुधाने तोंड पोळल्यावर ,ताकही फुंकून पिण्याचा” विचार करीत आहेत. सिने अभिनेत्यांनी अथवा अभिनेत्रींनीं निवडणूक लढवण्यास आमचा विरोध नाही. मात्र आम्ही मते देऊन त्यांना पुढे पाठवले कि त्यांनी मागचे विसरू नये एवढीच आमची अपेक्षा आहे ,असे मत पश्चिम उपनगरातील बहुतांश गृहिणींनी व्यक्त केले आहे. त्यातूनच ” काँग्रेस नेत्यांना जे जमले नाही ,ते अभिनेत्यांना कसे जमणार” अशी घोषणा उदयास आली आहे.

बुंदसे गई वो ,हौदसे नाही आती…
उत्तर पश्चिम मतदार संघातील काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचीही वाट यंदा बिकट आहे. कारण खासदारकीची उमेदवारी दिल्यावर काँग्रेसने मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद कडून घेत निरुपम यांची अवस्था तलवार आणि शस्त्रे काढून घेतलेल्या सरदारासारखी केली आहे.त्यातच माजी खासदार दिवंगत गुरुदास कामत समर्थकांचा निरुपम यांच्यावरील राग अद्यापही धगधगत असल्याचे मतदारसंघात दिसत आहे. शिवाय शिवसेना- भाजप युतीचे दिग्गज उमेदवार गजानन कीर्तिकर यांचे तगडे आव्हान निरुपम यांच्यापुढे आहे. या निवडणुकीत पराभूत झाल्यास निरुपम यांची अवस्था “ना घरका,ना घाटका” अशी होणार आहे .त्यामुळे युतीचे कार्यकर्ते निरुपम यांच्याविरोधात “बुंदसे गई, वो हौदसे नही आती” अशा घोषणा देताना दिसत आहेत.