निकालांपर्यंत टेन्शन… टेन्शन… निवडणूक अंदाजांनी उडाली अनेक नेत्यांची झोप

पाचही राज्यांतील मतदान आटोपल्यावर गुरुवारी आलेल्या एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर अंदाजांनी काँग्रेसला पुढे चाल मिळण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर हेच होत असते, कधी हे भाकित अचूक ठरते तर, कधी साफ गडबड होते. या राज्यांत कुणाचे सरकार स्थापन होईल, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल टीव्ही चॅनेलवरील तज्ञांचे छातीठोक दावे सुरू झाले असले तरी हे अंदाज खरे ठरणार की खोटे याचे उत्तर येत्या रविवारीच मिळणार आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये टेन्शन, टेन्शनचाच माहोल असणार आहे.

एक्झिट पोल अर्थात मतदारांचा कल

हिंदुस्थानात अनेक संस्था, चॅनेलकडून मतदारांचा कल आजमावला जातो. मतदान करून मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱया मतदारांना ही पाहणी करणाऱया व्यक्तींकडून काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांद्वारे गोळा केलेल्या या माहितीच्या आधारे निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवला जातो.

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये फरक

एक्झिट पोल मतदानानंतरचा कल आजमावतात तर, ओपिनियन पोल मतदानाअगोदर मतदारांच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतात. ओपिनियन पोलमध्ये मतदार आपली मते देतात आणि त्याच आधारावर सर्वेक्षण समोर येते. आता यातील एक मुख्य फरक असा की, जे मतदान करू शकत नाहीत, करणार नाहीत तेही ओपिनियन पोलमध्ये आपले मत देऊ शकतात. एक्झिट पोल मात्र थेट मतदान केंद्रांवर मतदारांचा काwल विचारत असल्यामुळे तुलनेने पुष्कळसा अचूक असतो, असे म्हणता येईल.

कधी चूक कधी बरोबर

2004 च्या लोकसभा निवडणुका असोत किंवा 2009 च्या सार्वत्रिक निवडणुका, जवळपास सर्वच पाहणी संस्थांचे दावे फोल ठरले होते. 2004 मध्ये एनडीएचे पुनरागमन होत असल्याचा दावा करण्यात आला होता पण प्रत्यक्षात काँग्रेस सत्तेत आली. 2009 मध्येही असाच प्रकार घडला होता. 2014 च्या निवडणुकीत सर्वात अचूक दावा ’चाणक्य’ एजन्सीचा होता. एनडीएला बंपर 340 जागा मिळू शकतात आणि यूपीए 70 पर्यंत मर्यादित राहील, असा त्यांचा अंदाज होता. 2021 मध्ये पश्चिम बंगालमधील जागा वाढल्या तरी ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला भाजप हादरवू शकला नाही. रविवारी देशात काय चित्र असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.