ई-वाहनांची परिवहन विभागाकडून झाडाझडती, तीन दिवसांत पाच लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

वाढत्या इंधन दरामुळे ई- वाहनांची मागणी प्रचंड वाढली असून अशा वाहनांना अचानक आगी लागल्याच्या घटनाही घडल्या असून त्यात काही जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे अशा ई-वाहनांवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन विभागाने अलीकडेच झाडाझडती मोहीम घेतली होती. 23 ते 25 मेदरम्यान राज्यभरात तीन दिवस मोहीम राबवत 2,238 वाहनांची झडती घेण्यात आली असून त्यात 605 वाहने दोषी आढळली. त्यापैकी 422 वाहनांचा अटकाव करण्यात आला. तर 274 शोरूमना भेट देण्यात आली असून 70 प्रकरणे निकाली काढीत 5 लाख 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी वाहने कमी सीसी क्षमतेच्या असल्याने आरटीओकडे त्यांच्या रजिस्ट्रेशनची गरज नसते किंवा ड्रायव्हिंग परवान्याशिवाय त्या दुचाकी चालविण्यात येत असतात. ग्रामीण भागात याचा फायदा घेत काहीजण त्यात बदल करून तिचा वेग वाढवत असून बॅटरीची क्षमतादेखील वाढवत आहेत. त्यामुळे वाहनांना आगी लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. वाहनात काही बदल किंवा नियमभंग करण्यात कंपनी दोषी आढळली तर उत्पादक कंपनीवर शंभर कोटीपर्यंत दंड आकारणी होऊ शकेल असे सूत्रांनी सांगितले.