सातारा जिल्ह्यातील वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस्अॅपद्वारे माहिती द्या; महावितरणचे आवाहन

electricity

सातारा जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदकामामुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलवरील व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 27 तक्रारी प्राप्त झाल्या असून 24 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित 3 तक्रारींमध्ये प्रशासकीय मंजुरीची गरज असल्याने कार्यवाही सुरु आहे.

ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने सध्या उसतोडणीचे काम वेगाने सुरु आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजतारांचे घर्षण होऊन किंवा इतर विजेच्या समस्यांमुळे ऊसाला आग लागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी वीजयंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉटस्अॅपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्ती कामे करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यासाठी 7875768554 हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.

व्हॉटस् अॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस्अॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या