ऑक्टोबर हीटमुळे राज्यात वीज तापली, विजेची मागणी 21 हजार मेगावॅटवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

ऑक्टोबर हीटमुळे तापमानाचा पारा 36 अंशांच्या वर गेल्याने मुंबईकरांसह राज्यभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. वाढलेला उन्हाचा चटका आणि घामांच्या थरांमुळे गेल्या तीन दिवसांपासून एसी, पंखा आणि कुलरचा वेग वाढला आहे. तसेच कृषिपंपांचा वीज वापर वाढला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून 15 हजार मेगावॅटच्या घरात अडखळणाऱ्या विजेची मागणी चक्क 21 हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे.

राज्यभरात महावितरणचे अडीच कोटी वीज ग्राहक असून बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे एकत्रित सुमारे 40 लाख वीज ग्राहक आहेत. गेल्या चार महिन्यांतील विजेची सर्वाधिक 17 हजार मेगावॅट एवढी मागणी काल महावितरणकडे नोंदली आहे.  महावितरणने महानिर्मितीकडून 5700 मेगावॅट, खासगी प्रकल्पातून सहा हजार  तर केंद्रीय प्रकल्पातून सात हजार मेगावॅट वीज घेतली आहे.

मुंबईत 3300 मेगावॅटवर

महावितरणकडे  17 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली असतानाच मुंबईतही 3300 मेगावॅटपेक्षा जादा नोंदली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरने साडेबाराशे मेगावॅट, अदानीने अडीचशे तर एक्स्चेंजमधून सुमारे 1806 मेगावॅट वीज घेतली आहे.