आधीच लॉकडाऊन, त्यातच 16 तास वीजडाऊन; दिवा, कळवावासियांचे ‘वर्क फॉर्म होम’ शटडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये कार्यालयात न जाणाऱ्या दिवा – कळवावासियांचे ‘वर्क फॉर्म होम’ गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या लपंडावाने शटडाऊन झाले आहे. वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने दिव्यातील वीजपुरवठा 16 तास तर कळवा, पारसिकनगर आणि खारेगाव परिसरातील वीजपुरवठा सात तासांसाठी खंडित झाला होता. आधीच लॉकडाऊन त्यामुळे घरात बसलेल्या नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने घामाघूम सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दिवा पूर्वेतील साबेगाव परिसरात भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रात्री 9 वाजल्यापासून साबेगाव, दिवा पश्चिम, ऐनजे कॉम्प्लेक्स आणि दिवा रेल्वे स्थानक परिसर या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ठाण्यातील साकेत खाडीवर असलेल्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याने सकाळी 7.30 वाजल्यापासून कळव्यातील पारसिकनगर आणि खारेगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अखेर दुरुस्तीनंतर 16 तासांनी दिव्यातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. तर सात तासांनी कळवा परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे स्थानिक सत्यम शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात बहुतांश कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करावे लागत आहे. त्यांनाही या विजेच्या लपंडावाचा फटका बसला. तर दिव्यातील विजेचा खेळखंडोबा आठवडाभरापासून कायम असल्याचे स्थानिक रहिवासी ऋतुजा मेस्त्री यांनी सांगितले.