अनलॉक-4 चा इफेक्ट, विजेच्या दैनंदिन मागणीत 2000 मेगावॅटची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने अनलॉक-4 जाहीर केल्याने सर्वच दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत विजेच्या मागणीत तब्बल 2000 हजार मेगावॅटची वाढ झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढील काळात उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी वीज कंपन्यांनी तांत्रिकदृष्टय़ा तयार राहावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

गणेशोत्सव काळात महावितरणकडे दररोज 14 ते 16 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात होती. मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने आणि अनलॉक-4 मुळे विविध कार्यालये, दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटबरोबरच दैनंदिन व्यवहार, उद्योगांना वेग येऊ लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत दोन हजार मेगावॅटची वाढ झाली असून 18 हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी परळी वीज केंद्रातून 250 मेगावॅट तर भुसावळ वीज केंद्रातून 500 मेगावॅट वाढीव वीज निर्मिती केली जात असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.