ऐन सणासुदीत दरवाढीचा ‘शॉक’, पुन्हा वीज महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Electric bill centres

पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस, अन्नधान्यासह सर्वच जीवनावश्यक बाबी महागल्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला आता ऐन सणासुदीच्या दिवसांत वीज दरवाढीचा पुन्हा शॉक बसणार आहे. पॉवर सिस्टम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे बील महाराष्ट्रासह 13 राज्यांनी थकविले आहे. ही थकबाकी भरण्यासाठी जनतेवर वीज दरवाढ लादली जाण्याची दाट शक्यता आहे.

उन्हाळा आणि गणपती, दसरा, दिवाळी या मोठय़ा सणासुदींच्या काळात विजेची मागणी वाढते तेव्हा राज्यांना वीजटंचाईचा सामना करावा लागतो. त्यावेळी इतर राज्यांच्या वीज प्रकल्पांमधून वीज घेता येते. मात्र, या पॉवर एक्सचेंजसाठी पॉवर सिस्टम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडची परवानगी लागते. त्यासाठी वीज बिल राज्यांना द्यावे लागते; परंतु 13 राज्यांनी पॉवर सिस्टम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे 5 हजार कोटी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी भरल्याशिवाय पॉवर एक्सचेंज करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता 13 राज्यांतील वीज कंपन्यांना पॉवर एक्सचेंज करता येणार नाही. थकबाकीचे ओझे ग्राहकांवर टाकले जाईल. पर्यायाने वीज बिल महागण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रासह 13 राज्यांतील जनतेला फटका
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आजपासून नवीन नियम जारी केले आहेत. थकबाकी सात महिन्यांत भरण्याची मुदत आहे.
पॉवर सिस्टम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडच्या निर्णयाचा फटका 13 राज्यांना बसणार आहे. महाराष्ट्रासह, तामीळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मणिपूर, मिझोराम आणि जम्मू-कश्मीरमधील वीज पंपन्यांना थकबाकी भरल्याशिवाय आता पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदी करता येणार नाही.