
सामना ऑनलाईन । मुंबई
बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या हत्तीच्या ‘हस्तिदंती’ वेदना आपल्याला ठाऊक आहेतच. त्यात आता ‘केस’ स्टडीची भर पडली आहे. गजराजच्या शेपटाचा केस काढून तो अंगठी, ब्रेसलेटमध्ये घालण्याची अंधश्रद्धा वाढीस लागली आहे. त्यामुळे हत्तींच्या वेदना वाढल्या आहेत. भायखळा येथील राणीच्या बागेतील हत्तींच्या बाबतीतही हा धक्कादायक प्रकार घडत आहे. तिथे प्रशासनाच्या डोळय़ांत धूळफेक करून शेपटाचा केस आणि पायाखालची माती चोरली जात आहे.
राणीच्या बागेत दोन हत्तीणी आहेत. या हत्तीणींच्या शेपटाचे केस काढून त्यांची विक्री होत असल्याची माहिती दैनिक ‘सामना’च्या हाती लागली आहे. एवढेच नव्हे तर हत्तीने पाय ठेवलेली मातीही लाभदायक समजून छोटय़ा पिशव्यांतून राणीच्या बागेबाहेर नेली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हत्तीच्या शेपटाचा केस हा काळा-तपकिरी रंगाचा साधारणपणे 7 ते 8 इंच लांबीचा असतो. तो मऊ असतो, तसेच लगेच तुटण्याची शक्यता असते. त्याचा वापर अंगठी, ब्रेसलेटमध्ये केला जातो. त्यासाठीच वन्य जीव कायद्याचे उल्लंघन करून शेपटाचे केस मिळवले जातात. हा एक केस 500 ते तीन हजार रुपयांना विकत घेतला जातो.
नकली केस विकून फसवणूक
हत्तीच्या शेपटाचे केस महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांतून आपल्याकडे आणले जातात. ते 100 टक्के असली केस असतील असे नाही. हत्तीच्या शेपटाच्या केसाच्या नावाखाली फसवण्याचे प्रकार घडत आहेत. खरे केस पाण्यात टाकले की मऊ होतात, अंगठी बनवताना ताणले की तुटतात, मात्र प्लॅस्टिकचे केस तुटत नाहीत. त्यावरून ते नकली असल्याचे समजते.
‘एलिफंट रिंग’ करण्यापूर्वी हे वाचा
महाकाय हत्तीचे शेपूट लहान असले तरी ते हत्तीच्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शेपूट हलवून हत्ती माश्या आणि कीटक दूर ठेवत असते. पाण्यात डुंबताना शेपटाच्या केसाने पाणी शरीरभर टाकत असते. शेपटाच्या मदतीने हत्ती आपले प्रेम, भावना व्यक्त करतो. मात्र काही माथेफिरू चार पैशांच्या हव्यासापोटी अक्षरशः हत्तींच्या शेपटाचा केस मुळापासून उपटतात. शेपूटच उरले नसल्यामुळे काही हत्तींना डोळय़ांचे संसर्ग झाले आहेत.
केस कशासाठी?
हत्तीच्या शेपटाचा केस आपल्या जवळ असेल तर दुष्ट शक्तींपासून रक्षण होते. वाईट स्वप्ने पडत नाहीत. घरात सुख, समृद्धी, प्रेम नांदते अशी अंधश्रद्धा आहे. म्हणून केस अंगठी, ब्रेसलेट या दागिन्यांत वापरतात. आफ्रिकेतील देशांतून केसांची आयात केली जाते.
पायाखालील मातीलाही आलंय मोल माती कशासाठी?
हत्ती बळकट आणि मजबूत प्राणी आहे. तो ज्या मातीवरून चालतो ती माती घराचे बांधकाम करताना वापरली तर ते घर हत्तीसारखे मजबूत बांधले जाते असा समज आहे. वास्तुशांतीच्या वेळी ज्या ठिकाणी वास्तुपुरुष ठेवला जातो त्या ठिकाणीही ही माती वापरली जाते. हत्तीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घरात लक्ष्मी स्थिर राहावी व भगवंताचा वासही राहावा या भावनेतून हत्तीच्या पायाखालची माती घर बांधताना वापरतात. प्रतीकात्मक स्वरूपात माती पूजेसाठी वापरली जाते.
तीन ते सात वर्षांची शिक्षा
सध्या मुंबईच्या रस्त्यांवर हत्ती दिसत नाहीत, मात्र मुंबईतील अनेक ज्वेलर्स एलिफंट रिंग बनवून देतात. त्यासाठी मुंबईबाहेरून हत्तीच्या शेपटाचे केस मिळवले जातात. हत्तीच्या शेपटाचा केस काढण्याचा गुन्हा उघड झाला तर वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत तीन ते सात वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांपेक्षा अधिक दंड बसू शकतो. हा गुन्हा शहरात उघड झाला तर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू ऑनिमल आणि आयपीसीअंतर्गत अधिक शिक्षा होऊ शकते. जंगलातील हत्तींच्या जवळही आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे असे प्रकार पाळीव वा रस्त्यावर फिरणाऱ्या हत्तींच्याबाबत सर्रास घडतात.
सुनिश सुबह्मण्यम, सेक्रेटरी, प्लांट ऍण्ड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) – मुंबई































































