Elgar Parishad case- आनंद तेलतुंबडे यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गोव्यातील कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करणारे आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता असा पोलिसांना दाट संशय आहे. याच प्रकरणात तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तेलतुंबडे यांच्या मुंबईतील घराची झडती देखील घेण्यात आली होती. तेलतुंबडे बे प्रतिबंधित माओवादी संघटनेशी निगडीत असून ते देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी तेलतुंबडे यांची अटकपूर्व जामीनासाठी केलेली याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाचा आदेश येताच पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तेलतुंबडे यांना मुंबईतील विमानतळावरून पहाटे अटक करण्यात आली. तेलतुंबडे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली जाणार आहे.

तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करतेवेळी न्यायाधीश के.डी.वडणे यांनी तेलतुंबडे यांच्याविरोधात तपास अधिकाऱ्यांनी सबळ पुरावे गोळा केले असल्याचं म्हटलं होतं. एल्गार परिषदेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास महत्वपूर्ण टप्प्यावर आला असून त्यासाठी तेलतुंबडे यांच्या चौकशीची गरज आहे. यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे असे न्यायाधीशांनी आदेशात म्हटले होते.

गेल्या वर्षी 28 ऑगस्टला पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असलल्याचा संशय असलेल्यांच्या घरावर छापे मारले होते. देशाच्या वेगवेगळ्या भागात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वरनॉन गोन्साल्विस आणि अरूण परेरा यांना पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीत राहणाऱ्या गौतम नवलाखा यांनी सातत्याने न्यायालयाकडून आदेश प्राप्त करत सातत्याने अटक टाळली आहे. स्टॅन स्वामी हा रांची इथला आरोपी अजून पोलिसांनी पकडला नसून, त्याबाबत फार तपशील कळू शकलेला नाहीये.