दोन हजार रुपये भरूनही शिक्षकांना प्रशिक्षण नाही, वरिष्ठ व निवड श्रेणी लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी राज्यभरातील पात्र शिक्षकांनी डिसेंबरमध्ये दोन हजार रुपये नोंदणी शुल्क भरूनही प्रशिक्षण मिळालेले नाही. शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे, मात्र शुल्क भरूनही प्रशिक्षणाला सुरुवात न झाल्याने 12 व 24 वर्षे सेवा पूर्ण करणारे शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

नोंदणी झाल्यानंतर किमान दोन महिन्यांत शिक्षकांना प्रशिक्षण मिळणे आवश्यक होते, मात्र तीन महिने होत आले तरी शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती मुंबई विभागाचे उपाध्यक्ष धनाजी साळुंखे यांनी वर्तविली आहे. शिक्षण विभागाची ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याची संपूर्ण तयारी ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी नोंदणी करणाऱया प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. तसेच हे प्रशिक्षण घेण्यास सर्व शिक्षकही तयार आहेत, परंतु ऑनलाइन प्रशिक्षण सुरू होत नाही म्हणून 12 आणि 24 वर्षे वेतन श्रेणीपासून शिक्षकांनी किती काळ वंचित ठेवायचे हा खरा प्रश्न आहे, असे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील म्हणाले.

 12 आणि 24 वर्षे वेतन श्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणाऱया सर्वच शिक्षकांना वेतन श्रेणीचे लाभ सुरू करा, अशी मागणीही शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे. दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रशिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला जाईल, असे सांगण्यात येत आहे, परंतु अद्याप तारखांसह कार्यक्रम घोषित झालेला नसल्याने प्रशिक्षण होणार की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.