एल्फिन्स्टन पूलबाधित लवकरच नव्या घरात,म्हाडा दोन दिवसांत एमएमआरडीएला घरे सुपूर्द करणार

एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱया दोन इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. म्हाडा पुढील दोन दिवसांत एमएमआरडीएला घराचा ताबा देणार असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यानंतर एमएमआरडीएकडून रहिवाशांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे.

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या कामामुळे येथील हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत 60 तर हाजी नुरानी या इमारतीत 23 रहिवाशी आहेत. आमचे याच परिसरात पुनर्वसन करा, अशी रहिवाशांची आग्रही मागणी होती. संबंधित रहिवाशांना दादर, माहीम, माटुंगा, वडाळा, प्रभादेवी, लोअर परळ या भागातील म्हाडाची घरे मालकी तत्वावर दिली जाणार आहेत. त्यानुसार एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी म्हाडाच्या 119 घरांची पाहणी केली असून त्यातील 300 ते 700 चौरस फुटांच्या 83 घरांची रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी निवड केली होती.

म्हाडाच्या तिजोरीत 90 कोटी जमा

एमएमआरडीएने रहिवाशांसाठी सुरुवातीला 83 घरांची निवड केली होती. आता मात्र एमएमआरडीएने म्हाडाकडे केवळ 78 घरांची मागणी केली आहे. रेडिरेकनरच्या 110 टक्के दर याप्रमाणे 78 घरांपोटी 90 कोटी रुपये नववर्षाच्या सुरुवातीला एमएमआरडीएने म्हाडाच्या तिजोरीत जमा केले आहेत. पुढील दोन दिवसांत ही घरे एमएमआरडीएला सुपूर्द करण्यात येतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. या घरांच्या दुरुस्तीवर खर्च केलेले दीड कोटी रुपये मिळावेत, अशी मागणीही म्हाडाकडून करण्यात आली आहे.