
मध्य रेल्वेवर 75 रेल्वे स्थानके असून त्यापैकी केवळ 26 स्थानकांवरच आपात्कालिन वैद्यकीय कक्षांची उभारणी करण्यात यश आले आहे. सध्याच्या घडीला या 26 स्थानकांपैकी केवळ 13 स्थानकांवरचे आपात्कालिन वैद्यकीय कक्ष प्रत्यक्षात सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. इतर 13 वैद्यकीय कक्षांच्या टेंडरची मुदत संपली असून त्यासाठीची टेंडर प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचे निर्बंध हटविले असले तरी उपनगरीय लोकलमध्ये दोन लसी घेतलेल्यांनाच तिकीट किंवा पास मिळत असले तरी मुंबईत लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या मोठी असल्याने लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिन्ही मार्गांवर रेल्वे रूळ क्रॉस करताना किंवा लोकलमधून पडून मृत्यू होणार्यांची संख्या आता पुन्हा वाढत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जखमी प्रवाशांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीचे उपचार मिळण्यासाठी उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्षांची (इमर्जन्सी मेडिकल रूमची) स्थापना करण्यात आली होती. कोरोना काळात यातील अनेक ईएमआरचे टेंडर संपले असून 26 स्थानकांपैकी 13 स्थानकांवरील ‘ईएमआर’ प्रत्यक्षात कार्यरत असून इतर स्थानकांवरील वैद्यकीय कक्ष सुरू करण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी टेंडर उघडण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकलचे अपघाती मृत्यू वाढत आहेत
लोकलच्या तिन्ही मार्गांवरचे अपघात पुन्हा वाढले असून दररोज सरासरी 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू होत आहे. पूर्वी हे प्रमाण दिवसाला दहा जणांचा मृत्यू इतके गंभीर होते. परंतू कोरोनापूर्व काळात दररोज 75 लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करायचे आता कोरोनाचे निर्बंध हटले असले तरी दोन लसी घेतलेल्यांनाच लोकलमध्ये प्रवेश आहे. त्यामुळे सध्या मुंबई उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची संख्या 36 लाख इतकी झाली आहे. लोकलमध्ये पिकअवरच्या काळात पहिल्या सारखीच गर्दी होत असली तरी नॉन पिकअवरला दुपारच्या वेळी पहिल्या सारखी गर्दी होत नाही.
या स्थानकांवर वैद्यकीय उपचाराची सोय
मध्य रेल्वेवर सुमारे 75 रेल्वे स्थानके असून कर्जत-कसारा-पनवेल या महत्वाच्या स्थानकांवरच वैद्यकीय कक्ष उघडण्यात आले आहेत. परंतू मधल्या बदलापूर ,वांगणी, आसनगाव, नेरळ, खर्डी, भिवपूरी, शेलू, कर्जत, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, डोंबिवली,कळवा, ठाणे, भांडुप, कुर्ला, दादर, चेंबुर, मानखुर्द, पनवेल या स्थानकांत आपात्कालिन वैद्यकीय कक्ष सध्या कार्यरत आहेत. तर दिवा,कल्याण,भायखळा, घाटकोपर, कसारा,गोंवडी, एलटीटी, वडाळा रोड, वाशी, विक्रोळी,शीव या स्थानकांवरील ईएमआरसाठी 21 जानेवारी रोजी टेंडर काढले असून 17 फेब्रुवारीला टेंडर उघडण्यात आले आहे. तर मुलुंड व मुंब्रा येथील ईएमआरसाठी 15 जानेवारीला मे.वन हेल्थ ठाणे या संस्थेला देकारपत्र जारी केले आहे.




























































