आयआयटी – आयआयएमच्या अपस्किलिंग अभ्यासक्रमांना नोकरदारांची पसंती, ब्रेक न घेता शिकण्याची संधी

करीअरमधील स्पर्धात्मकता, रोजगारक्षमता वाढविण्याकरिता आयआयटी, आयआयएमसारख्या शिक्षणसंस्थांकडून ऑनलाइन चालविल्या जाणाऱ्या लहानमोठ्या कौशल्य विकास (अपस्किलिंग) अभ्यासक्रमांना नोकरदारांकडून पसंती लाभत आहे. खासकरून तीन ते पाच वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या नोकरदारांचा अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे.

टेक्नोपॅक अ‍ॅडव्हायझर्सच्या ‘ऑनलाइन हायर एज्युकेशन, सर्टिफिकेशन अँड अपस्किलिंग मार्केट इन इंडिया’ या अहवालानुसार आयआयटी-आयआयएमच्या अपस्किलिंग अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांमध्ये जवळजवळ 70 टक्के विद्यार्थी हे तीन वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव असलेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बिग डेटा, इलेक्ट्रिक वाहने, बिझनेस मॅनेजमेंट आणि लीडरशिप अशा अभ्यासक्रमांना तरुण नोकरदारांची पसंती लाभत आहे. हे अभ्यासक्रम हायब्रिड पद्धतीने पूर्ण करता येतात. त्यामुळे करीअरमध्ये ब्रेक न घेता आपली कौशल्ये वाढविता येतात.

व्यवसायातील वास्तविक अडचणींचा सामना करण्याची कौशल्ये

आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मकता जपण्याकरिता उद्योजक आणि वरिष्ठ व्यावसायिकांकडूनही या अभ्यासक्रमांना पसंती मिळते. ते केवळ सैद्धांतिक नाहीत. त्यामुळे व्यवसायातील वास्तविक अडचणींचा सामना करण्याची कौशल्ये आत्मसात करता येतात, असे आयआयएममधून अलीकडेच एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण करणारे 84 वर्षीय डॉ. गिरीश मोहन गुप्ता यांनी सांगितले.

रोजगारक्षम राहण्याचा मार्ग

उद्योगांच्या गरजा आणि व्यावसायिक ज्ञान यांच्यातील दरी भरून काढण्यास अपस्किलिंग कोर्सेसची मदत होते. तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे कंपन्यांना नवीन साधने, प्लॅटफॉर्म आणि व्यवसाय मॉडेल्स स्वीकारणे भाग पडते आहे. अपस्किलिंग आता पर्यायी नसून, रोजगारक्षम राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे आयआयएम संबलपूरचे प्रोफेसर दिवाहर नादर यांनी सांगितले.