
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. येथे दहशतवाद्यी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये शोध मोहीम सुरू केली. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव उस्मान असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, असं सांगण्यात येत आहे.
यादी मंगळवारी रात्री उशिरा कठुआ जिल्ह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेजवळ एक पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना दिसला. लष्कराने त्यांची ड्रोनविरोधी यंत्रणा सक्रिय करून हे ड्रोन पाडलं. दहा दिवसांत पाकिस्तानी ड्रोन दिसण्याची ही पाचवी घटना होती. १७ जानेवारी रोजी संध्याकाळी रामगड सेक्टरमध्ये शेवटचा ड्रोन दिसला होता.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. त्यांना संशय आहे की, हे ड्रोन लष्करी स्थानांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा दहशतवाद्यांसाठी शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी वापरले जात आहेत.





























































