चिकन, मटन, माशांपेक्षा बिफ जास्त खा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला

मेघालयमधील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या सनबोर शुल्लई यांनी राज्यातील जनतेला अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शुल्लई यांनी राज्यातील जनतेला बिफ खाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. शुल्लई यांनी गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

मेघालयाचे पशुपालनमंत्री सनबोई शुल्लई यांनी शनिवारी बिफबाबत हे विधान केले. राज्यातील जनतेने चिकन, मटन आणि माशांपेक्षा बिफ जास्त प्रमाणात खावे, असे त्यांनी म्हटले आहे. आपण जनतेला बिफ खाण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. भाजप गोवंश हत्येवर निर्बंध आणेल, असा अल्पसंख्याक समुदायाचा समज आहे. जनतेतील हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण बिफ खाण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेने आपल्याला हवे ते खाण्याचा अधिकार दिला आहे. आपल्याला जे हवे,ते आपण खाऊ शकतो. त्यावर कोणीही कसलेही बंधन आणू शकत नाही. आपण मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्याही चर्चा करून गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गुराखी आणि बिफ खाणाऱ्या जनतेची अडचण होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आसाम-मेघालय सीमाप्रश्नाबाबतही शुल्लई यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचा वापर करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. आसासमधील नागरिक आमच्या राज्यातील नागरिकांना त्रास देत आहे. त्यांची दडपशाही सुरू आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ चहा पित चर्चा करण्याची नाही. या दडपशाहीला योग्य ते उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले. मात्र, आपण कोणत्याही हिंसाचाराला समर्थन देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या