
पंजाब नॅशनल बँकेचे कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात धूम ठोकणारा हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात शुक्रवारी ईडीने मोठी कारवाई केली. हाँगकाँग आणि चीनमधील नीरव मोदीच्या मालकीची 253 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
यात हिरे, दागिन्यांसह बँक ठेवींचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळय़ात मुख्य आरोपी असलेला नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद आहे. ईडीने नीरव मोदीविरोधात आर्थिक अफरातफर कायद्यांतर्गत मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या सर्व जंगम मालमत्ता असून त्यात हाँगकाँग आणि चीनमधील मालमत्तांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळाप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.




























































