Eng Vs Ind 3rd test हिंदुस्थानचा ‘विराट’ शो, इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे लक्ष्य

सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम

कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज 23वे कसोटी शतक आणि चेतेश्वर पुजारा व हार्दिक पांडय़ा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हिंदुस्थानने येथे सुरू असलेल्या तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी वर्चस्व गाजवले. विजयासाठी 521 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने बिनबाद 23 धावा केल्या असून आता त्यांना अद्याप 498 धावांची आवश्यकता आहे.

दरम्यान, त्याआधी 2 बाद 124 या धावसंख्येवरून टीम इंडियाने पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा या जोडीने 113 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला मोठी आघाडी मिळवून देण्याचे निश्चित केले. चेतेश्वर पुजाराने 9 चौकारांसह 72 धावांची खेळी साकारली. त्यानंतर विराट कोहलीने 10 चौकारांसह 103 धावांची संयमी खेळी केली. या दौऱयात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे.

रविवारी इंग्लंडचा निम्मा संघ गारद करणाऱया हार्दिक पांडय़ाने फलंदाजीतही आपली चुणूक दाखवली. त्याने 52 चेंडूंत एक षटकार व सात चौकारांसह नाबाद 52 धावा तडकावल्या.

कपिल देव यांच्याशी माझी तुलना नको!

इंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटींत हिंदुस्थानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर हार्दिक पांडय़ाच्या अष्टपैलू गुणांवर व त्याच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वेस्ट इंडीजचे महान खेळाडू मायकेल होल्ंिडग यांनीही त्याच्यावर टीका केली. तिसऱया कसोटीच्या पहिल्या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. मैदानावर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हार्दिक पांडय़ा म्हणाला, मला कधीच कपिल देव व्हायचे नव्हते. मी हार्दिक पांडय़ा आहे आणि मला हार्दिक पांडय़ाच राहू द्या.