इंजिनीयरही होऊ शकेल सायकॉलॉजिस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कॉम्प्युटर इंजिनीयरही आता मानसशास्त्रज्ञ होऊ शकतो. मेकॅनिकल इंजिनीयरला अकाऊंटन्सीमध्येही तज्ञ होता येईल. कारण इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये आता त्या क्षेत्राबाहेरचे विषयही शिकवण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून इंजिनीयरिंगच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे इंजिनीयरिंग महाविद्यालये चालवणे शिक्षण संस्थांना खर्चिक बनले आहे. देशातील अनेक खासगी शिक्षण संस्थांना त्यांच्याकडील इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी बंद करावे लागले आहेत. यावर उपाय म्हणून इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये आर्टस् आणि कॉमर्सबरोबरच अन्य विषयही शिकवण्यास एआयसीटीईने अलीकडेच मान्यता दिली. जागा रिक्त राहणे हे एकच कारण नसून इंजिनीयर्सना अन्य विषयाचेही ज्ञान असावे अशी वाढलेली मागणीही त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संस्थाही त्यादिशेने विचार करू लागल्या आहेत.

अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्रचेही अभ्यासक्रम
मुंबईतील थडोमल सहानी इंजिनीयरिंग महाविद्यालयासारख्या संस्थाही आता एम. ए. आणि एमएससी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी या संस्थांनी डेव्हलपमेंट स्टडीज ऍण्ड मीडिया कम्युनिकेशन्स विषयात एमए, एमएससी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अगदी आयआयटी संस्थांनीही इंजिनीयरिंगव्यतिरिक्त अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आदी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.