75 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या इंजिनीअरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरी शोधण्याच्या निमित्ताने मुंबईतील 75 वर्षांच्या वृद्ध महिलेकडे राहणाऱ्या नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एप्रिल 2016 मध्ये ही घटना घडली होती. ठार मारण्याची धमकी दिल्याने त्या वृद्धेने याबाबतची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, ऑगस्ट 2018 मध्ये त्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर निजामुद्दीन रहिमान या 35 वर्षांच्या इंजिनीअरला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. तामीळनाडूतील धरमपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला आहे.

महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर सहार पोलिसांनी एप्रिल 2016 नंतर मुंबईहून इतर राज्यात किंवा परदेशात गेलेल्या प्रवाशांची नावाची यादी मागवली. त्यात 150 निजामुद्दीन आढळले. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहचणे कठीण होते. तपासानंतर आरोपी तामीळनाडूमध्ये असल्याचे समजले. मात्र, त्याचे कुटुंबीय त्याच्याबाबतची कोणतीही माहिती देत नव्हते. तसेच तपासात सहकार्य करत नव्हते. त्यांचा माग काढत अखेर सहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

परदेशात नोकरी शोधण्यासाठी मुंबईत काही मुलाखती आहेत, असे सांगत लांबचा नातेवाईक असलेला निजामुद्दीन सुमारे दोन महिने आपल्याकडे राहायला होता. एप्रिल 2016 मध्ये त्याने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार महिलेने ऑगस्ट 2018 मध्ये सहार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आपण आतापर्यंत तक्रार दाखल केली नसल्याचे तिने सांगितले. तक्रार दाखल झाल्यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज कुमार यांच्या मार्दर्शनाखाली डीसीपी अनिल कुंभारे, शशिकांत माने, सुनैना नाटे यांच्या पथकाने शिताफीने तपास करून निजामुद्दीनला अटक केली आहे.